सांडपाण्याचा निचरा होणे अवघड : त्वरित स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ापूर्वी शहरातील आणि उपनगरातील नाल्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र काही ठराविक नाल्यांची स्वच्छता करून शहरांतर्गत बांधण्यात आलेल्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. कॉलेज रोडपासून धर्मवीर संभाजी चौकाकडे वाहणाऱया नाल्याच्या स्वच्छतेकडे मनपाने कानाडोळा केला आहे. या नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
कॉलेज रोडशेजारी दुतर्फा गटारी बांधण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सांडपाणी वाहण्यासाठी नालेदेखील आहेत. गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली परिसरातून हनुमान मंदिरजवळून केळकर बागमार्गे नाला वाहतो. पण या नाल्यावर बांधकाम करण्यात आल्यामुळे या नाल्याची स्वच्छता केली जात नाही. केळकर बागेतील काही दुकाने या नाल्यावर आहेत. पण या नाल्याची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. राणी चन्नम्मा चौक ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठय़ा गटारी बांधण्यात आल्या आहेत. याद्वारे पावसाचे पाणी तसेच नाल्याचे पाणी सोडण्यात आले आहे. पण या गटारींची स्वच्छता देखील केली जात नाही.
गटारी बांधल्यापासून स्वच्छता नाही
या गटारीपैकी निम्मा भाग कॅन्टोन्मेंट हद्दीलगत आहे, तर दुसरा भाग महापालिकेत येतो. पण गटार बांधकाम केल्यापासून आतापर्यंत स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे या गटारी माती आणि कचऱयाने भरल्या आहेत. परिणामी पावसाळय़ात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. येथील नाले आणि गटारींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी आणि व्यावसायिक करीत आहेत.









