सोहळ्याची आमंत्रण पत्रिका जारी
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स आणि राणी पॅमिला यांच्या राज्याभिषेकाच्या निमंत्रण पत्रिकेचा पहिला फोटो समोर आला आहे. 6 मे रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक सोहळा होणार असून मंगळवारी बकिंगहॅम पॅलेसने निमंत्रण पत्रिका जारी केली. याशिवाय राजा चार्ल्स यांचे चित्र असलेले रॉयल स्टॅम्पही जारी करण्यात आले आहेत.

वेस्टमिन्स्टर अॅबे येथे 6 मे रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सुमारे देश-विदेशातील 2,000 लोकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. निमंत्रण पत्रिका पुनर्नवीनीकरण केलेल्या कागदावर बनविली जाते. ब्रिटिश लोककथेतील प्रसिद्ध ग्रीन मॅन या पत्रिकेवर दिसून येत आहे. याशिवाय फ्लॉवर, वाईल्ड स्ट्रॉबेरी, मधमाशी, बटरफ्लाय, ब्रिटनचे राज्य चिन्ह असलेले लेडीबर्ड अशी अनेक चित्रेही पत्रिकेवर छापली आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. मंगळवारी राजा चार्ल्स यांना फोन करून त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या जागी फर्स्ट लेडी जिल बायडेन अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. फोनवर झालेल्या चर्चेत बायडेन यांनी राजा चार्ल्स यांना सोहळ्यानंतर मुद्दामहून भेटण्याचा शब्द दिला आहे.









