काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ, नव्या फ्ल्यूचा परिणाम असण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेले सहा महिने देशभर नियंत्रणात असणारा कोरोना आता पुन्हा डोके वर काढत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ दिसून आली असून यात केरळ आघाडीवर आहे. सध्या देशात एच 3 एन 2 नामक नव्या प्रकारच्या फ्ल्यूचा उद्रेक झाला असून त्याचा परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असावी, असे संशोधकांचे अनुमान आहे.
डॉक्टर्स तसेच तज्ञांनी लोकांना ढिलाई न दाखविण्याचे आवाहन केले आहे. अद्यापही कोरोना पूर्णतः नाहीसा झालेला नाही. स्थिती नियंत्रणात असली तरी अद्यापही दक्षता घ्यावीच लागणार आहे. मास्कचा उपयोग, शक्य तितके सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा नियमित उपयोग हे उपाय करावेच लागणार आहेत. अजून 1 वर्षभर तरी दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा इशारा देण्यात आला.
नव्या फ्ल्यूचा प्रादुर्भाव
सध्या देशात 8 राज्यांमध्ये नव्या फ्ल्यूचा उद्रेक झाला आहे. दोन तीन दिवस ताप आणि त्यानंतर किमान महिनाभर टिकणारा खोकला अशी याची लक्षणे आहेत. हा आजार मोठय़ा प्रमाणात जीवघेणा नसला तरी कर्नाटक आणि हरियाणात प्रत्येक एक अशा प्रकारे दोन बळी या आजाराने घेतले आहेत. त्यामुळे सावधानता बाळगण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.
काय केले पाहिजे
नव्या आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सोपे उपाय करावे लागणार आहेत. हात नेहमी सॅनिटायझरचा उपयोग करुन स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच अस्वच्छ हातांचा स्पर्श डोके किंवा नाकाला करु नये. नव्या आजाराचे विषाणूही डोळे आणि नाकावाटे शरीरात प्रवेश करत आहेत, त्यामुळे ही दक्षता घेणे आवश्यक आहे. ताप आल्यास पॅरासिटेमॉलचा उपयोग लाभदायक ठरतो. मात्र कोणतेही औषध डॉक्टरांशी चर्चा करुनच घ्यावे. सार्वजनिक स्थानी मास्कचा उपयोग आवर्जून करावा. तसेच शक्य तोवर अन्य व्यक्तींना स्पर्श करणे टाळावे, अशा उपायांची सूचना करण्यात आली आहे. हे उपाय सातत्याने केल्यास नव्या आजारापासून दूर राहणे सहज शक्य आहे, अशी तज्ञांची सूचना आहे.
केरळमध्ये रुग्णवाढ
कोरोनाच्या रुग्णसंख्येत केरळमध्ये वाढ दिसून आली आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या गेल्या आठवडय़ात 63 टक्के वाढल्याची स्थिती आहे. ही वाढ मोठी दिसत असली तरी उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या चिंता करण्यासारखी नाही. मात्र, गेल्या 70 दिवसांमध्ये ती प्रथमच देशभरात 3 हजारांहून अधिक झाली असून केंद्र सरकारने चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
तिसरा उद्रेक नाही
कोरोनाचा तिसरा उद्रेक अन्य देशांप्रमाणे भारतात झाला नाही. अतिव्यापक प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याने तिसऱया लाटेचा उद्रेक झाला नाही. सध्या रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी हा उद्रेक नाही. त्यामुळे हा चिंतेचा विषय नसला तरी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
नीतीआयोगाकडून विचार
सध्याच्या परिस्थितीवर नीती आयोगाकडून विचार करण्यात येत आहे. आयोगाने एका बैठकीचे आयोजनही केले आहे. आयोगाला तज्ञांनी अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या असून केंद्र सरकार राज्यांसाठी लवकरच दिशानिर्देश आणि दक्षतेच्या उपाययोजनांची माहिती प्रसारित करणार आहे. सर्वसामान्यांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. पण सावधानता महत्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे. नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.