वृत्तसंस्था / नवी दिल्ली
साऱ्या जगासह भारतात गेली अडीच वर्षे धुमाकूळ घातलेला कोरोना हा रोग आता ‘एन्डॅमिक’ अर्थात, ‘नित्यरोग’ होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे. मात्र, कोरोना कोणत्याही रुपात अवतरला तरी त्याला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एन्डॅमिक किंवा नित्यरोग याचा अर्थ विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट समुदायांमध्ये नेहमी पसरणारा रोग किंवा आजार असा आहे. ज्याप्रमाणे सर्दी, साधा फ्ल्यू, किंवा साधा ताप आदी संसर्गजन्य विकार असतात तसे आता कोरोनाचे स्वरुप होणार आहे. त्यामुळे नेहमींच्या औषधांनीही तो बरा होऊ शकेल. तसेच प्रारंभीच्या काळात त्याची जशी तीव्रता होती, तशी तो नित्यरोग झाल्यानंतर राहणार नाही. मात्र, कोरोनाची आतापर्यंत 260 हून अधिक रुपे परिचित झाली असून ती कमी अधिक प्रमाणात घातक आहेत. त्यामुळे तो एखाद्या नव्याच रुपात पुन्हा अवतरु शकतो. तसे झाले, तरी त्याच्याशी दोन हात करण्यास प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग सज्ज आहे, असेही मांडविया यांनी प्रतिपादन केले.
चीनमध्ये प्रारंभ
कोरोना आजाराचा प्रारंभ चीनमध्ये 2019 च्या अखेरीस झाला आणि त्याच देशातून तो जगभरात पसरला हे आता स्पष्ट झाले आहे. भारतातही या संसर्गजन्य रोगाचे दोन किंवा तीन उद्रेक होऊन गेले आहेत. याची लागण अधिकृत आकडेवारीनुसार भारतातील साडेचार कोटींहून अधिक लोकांना झालेली आहे. तसेच या रोगामुळे पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
आता प्रमाण कमी
2020 आणि 2021 मध्ये कोरोनाचे दोन उद्रेक झाल्यानंतर आता त्याचे प्रमाण आणि तीव्रता पुष्कळशी कमी झाली आहे. मात्र, अद्यापही दक्षता आवश्यक असून कोरोगाचा धोका पूर्णत: संपलेला नाही. आता त्याचे रुपांतर नेहमीच्या आजारामध्ये होत आहे. त्यामुळे साध्या फ्ल्यूच्या उद्रेकासारखा कोरोनाचाही उद्रेक मर्यादित प्रमाणात, मर्यादित स्थानांमध्ये आणि विशिष्ट कालावधीत होत राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची दाहकता आता कमी झाल्याने धोकाही कमी झाला आहे.
लसीकरणामुळे नियंत्रणात
कोरोनाच्या प्रथम उद्रेकानंतर त्वरित भारताने देशव्यापी प्रमाणात लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. भारताच्या भारत बायोटेक या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेने विक्रमी कमी वेळेत कोरोनावरील ‘कोव्हॅक्सिन’ नामक लस शोधून काढली. तसेच ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या कोव्हीशिल्ड या लसीचेही भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन हाती घेण्यात आले. साधारणत: 15 महिन्यांच्या अल्पावधीतच या लसीच्या 220 कोटी मात्रा भारतातील 120 कोटींहून अधिक लोकांना देण्यात आल्या. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे.









