भाजपचे दिग्गज नेतेही सामील होण्याची शक्यता : 3 दिवस चालणार बैठक
वृत्तसंस्था/पलक्कड
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पहिल्यांदाच केरळच्या पलक्कडमध्ये 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत आयोजित होणार आहे. पुढील वर्षी संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तीन दिवसीय या बैठकीत यावेळी सर्वाधिक जोर विरोधी पक्षांच्या जातनिहाय राजकारणावर तोडगा काढण्यावर असेल. राष्ट्रीय राजकारणात भाजपचे कमी झालेले वर्चस्व पाहता संघ आता केंद्रात आणखी महत्त्वपूर्ण भूमिका इच्छित असल्याची चर्चा आहे. संघ परिवार आगामी वर्षांमध्ये स्वत:च्या संबंधित 35 संघटनांना समाजात वाढीव हिस्सेदारी मिळवून देऊ इच्छितो. याकरता एक रोडमॅप तयार केला जाण्याची शक्यता आहे.
या संमेलनात संघाच्या वतीने सरसंघचालक मोहन भागवत, महासचिव दत्तात्रेय होसबाळे, सर्व सहा संयुक्त महासचिव आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी भाग घेणार आहेत. तर भाजपच्या वतीने पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, महासचिव बी.एल. संतोष आणि संयुक्त महासचिव समवेत अन्य लोक सामील होण्याची अपेक्षा आहे. संघ देखील स्वत:चा विस्तार करण्यासाठी विविध स्वतंत्र हिंदू संघटना आणि दबावगटांसोबत मजबूत संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. विहिंपला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि झोपडपट्ट्यांमधील लोकांदरम्यान सामाजिक सौहार्द वाढविण्याचे काम सोपविण्यात आल्याचे समजते.
सामाजिक समरसता अभियानाने जातीय विभाजन संपविण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. अलिकडच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या झटक्यानंतर याकडे पुन्हा लक्ष देण्याची आवश्यकता जाणवत आहे. उत्तरप्रदेशातील पराभवामागे दलितांनी भाजपपासून अंतर राखल्याचे कारण असल्याचे मानले गेले आहे. उत्तरप्रदेशातील पराभवामुळे पक्षाला 240 जागांवर समाधान मानावे लागले होते. तसेच लोकसभेत भाजप बहुमतापासून वंचित राहिला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. तसेच ते दलित आणि मागासांना किती भागीदारी मिळतेय असा प्रश्न उपस्थित करत आहे. यामुळे भाजपवरील राजकीय दबाव वाढल्याचे चित्र आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी भाजपकडून मान्य होण्याची शक्यता नाही. परंतु याप्रकरणी अन्य मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे आणि याप्रकरणी संघाकडून मदत होण्याची शक्यता आहे. अलिकडेच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी एका दलित अधिकाऱ्याची करण्यात आलेली नियुक्ती याचेच द्योतक मानले जात आहे.
वाढीव भूमिकेची इच्छा
सद्यकाळात भाजप नेतृत्व स्वत:ची वैचारिक पालक संघटनेसोबत संबंध सुधारत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर संघाने उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये बैठकांचा धडाका लावला आहे. उत्तरप्रदेशपासून मध्यप्रदेशपर्यंत संघाच्या समन्वय बैठका पार पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सरसंघचालकांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली होती. त्यांतर उत्तरप्रदेशात पक्षसंघटना विरुद्ध सरकार असा वाद उभा ठाकल्यावर संघाने हस्तक्षेप केला होता असे मानले जाते. आगामी काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याचमुळे हरियाणात देखील सातत्याने समन्वय बैठका पार पडल्या आहेत. तिकिटवाटपासून प्रचारमोहीम, अन्य पक्षांमधून येणारे नेते इत्यादी मुद्द्यांवर संघाच्या नेत्यांशी भाजपने सल्लामसलत चालविली आहे. राम माधव यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी नियुक्ती देखील याचाच संकेत आहे.









