पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक उद्यापासून (गुरवार) 16 सप्टेंबरपर्यंत पुणे येथे होत असून, या बैठकीत 36 संघटनांचे 266 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
आंबेकर म्हणाले, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे, तसेच डॉ. कृष्णगोपालजी, डॉ. मनमोहनजी वैद्य, अरुण कुमारजी, मुकुंदाजी आणि रामदत्तजी चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारावर आधारित आर्थिक धोरण, त्याचबरोबर जातिभेद संपुष्टात येईल असा समरसतापूर्ण व्यवहार अशा अनेक विषयांवर या तीन दिवसांत विचारविनिमय होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.








