सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय सहकार सप्ताहाची सांगता
बेळगाव : सहकार चळवळ ही जनतेची चळवळ असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ती आधार ठरली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी सहकारी संस्था उपयुक्त ठरू लागल्या आहेत. सहकार चळवळीमुळेच शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे, असे विचार सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी मांडले. 71 व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कर्नाटक राज्य सौहार्द फेडरल को-ऑप. तसेच इतर सलग्न संस्थांच्यावतीने सहकार सप्ताहाचे बुधवारी जेएनएमसीच्या जिरगे सभागृहात आयोजिले होते. व्यासपीठावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार राजू सेठ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अशोक पट्टण, दुर्योधन ऐहोळे, विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सौहार्द फेडरल को-ऑप. लि.चे संचालक जगदीश कवटगीमठ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कलगुडे उपस्थित होते. मंत्री राजण्णा म्हणाले, साखर कारखाने, कृषी उत्पादन आणि उत्पादित माल विक्रीसाठीही सहकार चळवळ महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट करण्याचे काम सहकार चळवळीतून होते.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गुजरात, महाराष्ट्रनंतर कर्नाटकातही सहकार चळवळ विस्तारत असल्याचे सांगितले. अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अधिक आहे. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांची संख्याही मोठी आहे. या साखर कारखान्यांतून साखरेबरोबरच इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. ऊस, मका आणि इतर मालापासून इथेनॉल निर्माण केले जात आहे. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. सहकार सप्ताहानिमित्त जागृती रॅली काढण्यात आली. 14 ते 20 नोव्हेंबरदरम्यान सहकार सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सहकारांतर्गत येणाऱ्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा उत्पादक सहकारी बँक, तालुका पणन सहकारी संस्था, ग्रामीण विकास बँक, कृषी पत्तीन संस्था, सहकारी साखर कारखाने यांचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









