ओलमणीत शाहू हायस्कूलच्या नूतन वाचनालय, शैक्षणिक कक्ष, क्रीडा संकुलाचे उद्घाटन
वार्ताहर/जांबोटी
समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, तो उच्चशिक्षित झाला पाहिजे, असे विद्यार्थी घडविण्यासाठी संस्थेला समाजातील सेवाभावी संस्थांचे आतापर्यंत मौलिक सहकार्य लाभले आहे. आपल्या संस्थेतील शाळांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे ऋण संस्था कदापि विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन द. म. शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी केले. ते द. म. शिक्षण मंडळ संचलित ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये सीएसआर निधी अंतर्गत बांधलेल्या नूतन वाचनालय इमारत, क्रीडा भवन व स्वच्छतागृह उद्घाटन, कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष तुकाराम साबळे हे होते.
मुख्याध्यापक सी. एस. कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शांती फोमॅक्स प्रा. लि. बेळगाव यांच्या सौजन्यातून बांधण्यात आलेल्या नूतन शैक्षणिक कक्ष व वाचनालयाचे उद्घाटन, शांती फोमॅक्सचे उपाध्यक्ष शांतीलाल पोरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. एकेपी फाउंड्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून बांधण्यात आलेल्या जिमखाना हॉल व स्वच्छतागृहाचे उद्घाटन उद्योगपती राम भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. अभिषेक अलॉइस प्रा. लि. बेळगाव यांच्यावतीने देण्यात आलेल्या फर्निचरचे वितरण अभिषेक अलॉईजचे संस्थापक माधव नरसिंह आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बेम्कोचे व्यवस्थापक अरविंद पालकर यांच्या सौजन्यातून मिळालेल्या आठ संगणकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगीं सर्व टीम व देणगीदारांचा हायस्कूलच्यावतीने सत्कार करण्यात आला.
गुणी विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर द. म. शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ पाटील, रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी उपस्थित होते.









