प्रतिनिधी/ पणजी
महासागर विज्ञान क्षेत्रातील उपक्रमांसाठी खास आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने दोना पावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आणि ढाका, बांगलादेश येथील वंगबंधू शेख मुजीबुर रहमान मेरिटाइम युनिव्हर्सिटी यांच्यात शनिवारी विशेष सहकार्य करार करण्यात आला. एनआयओचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग आणि बीएसएमआरएमयूचे रिअर अॅडमिरल मोहम्मद मूसा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पुढील पाच वर्षांसाठी हा करार राहणार आहे.
या करारामुळे महासागर विज्ञानाच्या क्षेत्रातील उपक्रमांसाठी एक आराखडा तयार करणे शक्य होईल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाच्या फायद्यासाठी संशोधन आणि विकासाच्या प्रगतीस हातभार लागेल आणि दोन्ही देशांमधील ब्लू इकॉनॉमी (नील अर्थव्यवस्था) मोहिमेला हातभार लागेल. याशिवाय या करारामुळे क्षमता निर्मिती आणि मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीनेही सहकार्य बळकट होण्याचा विश्वास वर्तविण्यात आला आहे.
या करारासाठी फॅकल्टी ऑफ अर्थ अँड ओशन सायन्स बीएसएमआरएमयूचे डीन कॅप्टन एस. एम. मोईनोद्दीन, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाचे नौदल सल्लागार कॅप्टन जयंत महाडिक, एनआयओचे सहयोग डेस्क प्रभारी वेंकट कृष्णमूर्ती, आंतरराष्ट्रीय एस अँड टी अफेअर्स ग्रुपचे प्रमुख डॉ. नरसिंह ठाकूर आणि एनआयओ मुख्यालयातील आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवहार संचालनालयाच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला.









