मुंगी. किती चिमुकला जीव! तरीही तिचे पाऊल अध्यात्मात आणि साहित्य क्षेत्रात सारखे डोकावते. मुंगीच्या पावलाने येणे-जाणे हा वाक्प्रचार भाषेमध्ये वापरतात. एखादे संकट किंवा रोग अकस्मात येतो मात्र त्याचे पडसाद जायला उशीर लागतो, तेव्हा त्याची गती मुंगीच्या पावलांची असते. निरीक्षण असे आहे की मुंग्या भराभर चालतात. माणसे सावकाश चालणाऱ्याला मुंगीच्या पावलांची उपमा देतात. मनुष्य शरीरातील सर्व अवयव महत्त्वाचे आहेत, परंतु पावलांना विशेष महत्त्व आहे. माणसाची पावले कुठे वळतात यावर त्याचे अख्खे जगणे अवलंबून आहे. ती मद्यालयाकडे जातात की देवालयाकडे यावर कुसंग-सत्संग ठरतो.
श्री रामरक्षा कवच यामध्ये म्हटले आहे की ‘पादौ बिभीषण: श्रीद:, पातु रामो खिलं वपु:’. रावणाच्या राज्यात श्रीरामविरोधी वातावरण असताना, रावणाचा धाक असताना बिभीषणाची पावले निर्धाराने, समर्पणाने श्रीरामांकडे वळली आणि बिभीषण श्रीरामरूपात विरघळून गेला. भक्तीच्या उत्कट आविष्काराने श्रीरामांची पावले सती अहल्येकडे व प्रेममूर्ती शबरी मातेच्या आश्रमाकडे वळली. पाऊल हा शब्द व्यवहारात अनेकदा उच्चारला जातो. पावलांना नाद व अर्थ असतो. ती हलकी, हळू, ठाम, दणादण, निश्चयी आणि चोरटीदेखील असतात. पावले साक्षीदार असतात. स्वत:चा ठसा उमटवतात. पावले ही पशुपक्षी, कीटक यांचीसुद्धा महत्त्वाची असतात.
सकाळी अंगणामध्ये स्त्रिया रांगोळी काढताना लक्ष्मीची पावले रेखाटतात. उभ्या गौरी महालक्ष्मीच्या सणाला, अमावास्येला, लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळीने घर सजते. हळदी कुंकू आणि रेखाटलेल्या पावलांना सोनेरी झळाळी लाभो असे गृहलक्ष्मीला वाटते. सोने म्हणजे वैभव, ऐश्वर्य आणि चिरंजीवता. लक्ष्मीची आरती करताना म्हणतात, ‘हाती कडे पायी तोडे पैंजणांची झुणझुण, नथ कुड्या बाळी बुगड्या कंकणांची रुणझुण, मधुर सुरांच्या नादामध्ये भक्ताघरी चालली, सोनियांच्या पावलांनी लक्ष्मी आली!’ सुवर्ण वर्णाची लक्ष्मीची पावले घरामध्ये स्थिर असोत ही प्रार्थना भक्त करतात.
वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे श्री औदुंबर क्षेत्राचा महिमा सांगणारे एक पद आहे. ‘भेटीलागी माझे मन उतावीळ, कधी मी पाऊले पाहीन डोळां’. औदुंबर क्षेत्र म्हणजे दुसरे वैकुंठ असून स्वर्गीच्या सुरवरांनाही तिथे जन्म घ्यावासा वाटतो.
श्रीदत्त प्रभूंचा तिथे वास असून श्री नृसिंह सरस्वती यतिरूपे येतात. कळकळून म्हटलेल्या या पदात भेटीची व्याकुळता आणि ओढ एवढी तीव्र आहे की पद म्हणताना भक्तांचा कंठ दाटून येतो. श्री दत्तप्रभूंच्या पावलांची पूजा श्रेष्ठ आहे. त्यांच्या रूपापेक्षा पाऊले पूजण्याचे कारण श्री दत्तप्रभूंचा वास सृष्टीमधल्या चराचरात, सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे. ते कुठेही, कोणत्याही देशात, रूपात प्रकट होतात म्हणून ती पाऊले वंदनीय आहेत.
पावलांची ओढ अनुभवता येते ती पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीमध्ये. वारकऱ्यांच्या पावलांना विठुरायांच्या पावलांची ओढ अशी लागते की त्यांची पावले अनवाणी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता धावत सुटतात. विठुरायाचे पंढरपूर जवळ आले, कळस दिसला की त्यांचे अस्तित्व विसरून वारकरी पावलांना शरण जातात. त्यांची पावले त्यांना विठुरायापर्यंत घेऊन जातात. ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडुनिया गाठ’ या गाण्यात म्हटले आहे की ‘आप्त इष्ट सारे सगेसोयरे ते, पाहुनिया हे सारे फिरविती पाठ..’ लौकिकातले सगेसोयरे यांची साथ देह पडेपर्यंत असते. विठुरायाची साथ ही जन्मजन्मांची असते.
सर्व तीर्थक्षेत्री अनेक भक्त पौर्णिमा व एकादशी या तिथीला पायी वारी करतात. संतांच्या दर्शनाला त्यांच्या गावाला पायी जाणे भक्त पसंत करतात. पायी वारीचा नवस करतात. नर्मदा परिक्रमा ही पायीच करायची असते. मैलोनमैल पायी चालत जाण्याचे रहस्य संत तुकाराम महाराजांनी एका अभंगातून सांगितले आहे.
ते म्हणतात, ‘राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली’… वारीमध्ये भक्त परमेश्वराचे नित्य नामस्मरण करतात. त्यांचे अखंड अनुसंधान असते. ‘न विसंबे क्षणभरी’ अशी अवस्था असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, श्रीरामांचे नामस्मरण करीत जो वाट चालतो त्याला प्रत्येक पाऊला पाऊली यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. वारकरी हजारो पावले चालतात. त्यांच्याजवळ किती यज्ञांचे पुण्य असेल बरे? महाराज म्हणतात, ‘धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर’. परमेश्वराच्या दिशेने दहा पाऊले टाकली की तो वीस पावले भक्तांसाठी धावत येतो. कारण ‘ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे जीवन्मुक्त.’ याची देही याची डोळा त्याला मुक्तीचा लाभ घडतो.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली एका अभंगात म्हणतात, ‘बरवी पाऊले पाऊले, सुंदर सुकुमार पाऊले, शीतळ हरीची पाऊले, गोमटी हरीची पाऊले’. हरीची पाऊले ही ‘बरवी’ आहेत. त्या पावलांचा आविष्कार हा अनेक भक्तांमध्ये विस्तारलाय. ती सुंदर, सुकुमार कापसापेक्षाही मऊ आहेत. परमेश्वराच्या आणि संतांच्या पावलांचा स्पर्श ज्यांनी अनुभवला आहे ते हे सांगू शकतील की ती पावले अतिशय कोमल असतात.
माऊली म्हणतात, ‘शीतळ हरीची पाऊले’. प्रापंचिक माणसाचे डोके भवरोगाने तापले असते. भवतापाने तो शिणला असतो. अनन्य भावाने शरण जात जेव्हा तो हरीच्या पावलांवर मस्तक ठेवतो तेव्हा त्याचे मन शांत, शीतळ होते. त्याचा भवताप या थंडाव्याने उतरून जातो. ‘गोमटी हरीची पाऊले..’ गोमटी याचा अर्थ पारमार्थिक कल्याण असा आहे, असे पू. मामा देशपांडे म्हणतात. मस्तकातल्या साऱ्या शिरांचा अंत पायात होतो म्हणून संतांच्या पायावर डोके ठेवतात. परमेश्वराकडे जाण्याची पाऊलवाट संतांनी निर्माण केली. त्या वाटेने चालत अनेकांनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अनुभव घेतला व ते तृप्त झाले. नवविधा भक्ती ही भगवंताच्या दारी जाण्यासाठी पाऊलवाटच आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी?’ त्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘झाडू संतांचे मारग, आडरानी भरले जग’. पाऊलवाटांवरची वाटचाल थांबली तर त्या पाऊलवाटा पुसून जातात. म्हणून संतच संतांचे मार्ग झाडायला पुन्हा पुन्हा जन्म घेतात.
-स्नेहा शिनखेडे








