गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद
नायजेरियन शेफ हिल्डा बाची हेने सलग 93 तास अन् 11 मिनिटांपर्यंत न थांबता स्वयंपाक केल्याचा दावा केला आहे. या मॅराथॉन कुकिंगनंतर सर्वाधिक काळापर्यंत सोलो कुकिंग सेशनसाठी हिल्डाचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. हिल्डाने नायजेरियाच्या लागोस येथील लेक्कीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हा विक्रम केला आहे.
यापूर्वी हा विक्रम भारतीय शेफ लता टंडन यांच्या नावावर होता. लता यांनी 2019 मध्ये लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात सलग 87 तास अन् 46 मिनिटांपर्यंत स्वयंपाक तयार करत विक्रम नोंदविला होता. आता या विक्रमाला नायजेरियन शेफ हिल्डाने मोडीत काढले आहे.

26 वर्षीय हिल्डा बाचीने कुकिंगचा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करण्यासाठी सलग 4 दिवसांपर्यंत स्वत:च्या पायांवर उभे राहण्यासाठी मागील महिन्यात प्रशिक्षण घेतले होते. तर विक्रमी कामगिरी नायजेरियन खाद्यपदार्थांना जागतिक ओळख मिळवून देण्यास मदत करणार असल्याचे हिल्डाने म्हटले आहे.
नायजेरियन खाद्यपदार्थांचा जगभरात प्रचार व्हावा. अमेरिकन घरात एगुसी सूप वारंवार तयार केले जावे. कुठल्याही सुपरमार्केटमध्ये गेल्यावर तेथे नायजेरियन खाद्यसामग्री शोधली जावी अशी माझी इच्छा असल्याचे हिल्डाने म्हटले आहे. नायजेरियात अत्यंत अधिक महागाई दर, इंधनाची कमतरता आणि इतर आर्थिक प्रश्न निर्माण झाले असताना बाचीने हा विक्रम नोंदविला आहे. लागोसमध्ये हिल्डा यापूर्वी अत्यंत महनीय लोकांसाठी कुकिंगचे काम करत होती. यात राज्याचे गव्हर्नर, देशाचे तत्कालीन उपाध्यक्ष, नायजेरियन अफ्रोबीट्स संगीत स्टार तिवा सॅवेज समवेत अनेकांसाठी तिने काम केले आहे. हिल्डाने यापूर्वी टेलिव्हिजन कुकिंग शोचे सूत्रसंचालन केले आहे. तसेच पश्चिम आफ्रिकन पारंपरिक खाद्यपदार्थ विषयक स्पर्धेची ती विजेती राहिली आहे.









