दोन महिलांसह तिघेजण गंभीर : कुकरचे झाले तुकडे, हॉटेलला आग
वार्ताहर/बाळेकुंद्री
कूकरचा स्फोट झाल्याने तिघेजण गंभीर जखमी तर सहाजण किरकोळ जखमी झाल्याची घटना सौंदत्ती शहरात मंगळवारी घडली आहे. स्फोट इतका जोरदार होता की कूकरचे तुकडे झाले होते. हॉटेललाही आग लागली. यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आलेले यादगिरी जिल्ह्याचे पाच तर बेंगळूर येथील चार भाविक असे 9 भाविक जखमी झाले असून यात दोन महिला, एक पुरूष असे तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हुबळी येथील केवायएम इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित सहा महिलांना सौंदत्ती येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकली
नाहीत. याविषयी अधिक माहिती अशी की, यादगिरी जिल्ह्याचे पाच तर बेंगळूर येथील चार असे 9 भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. या सर्व भाविकांनी सौंदत्ती येथील रेणुका सागर लॉज या खासगी हॉटेलच्या खोलीत मुक्काम केला होता. मंगळवारी देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी गोडपदार्थ बनविण्यासाठी त्यांनी कूकरमध्ये डाळ शिजविण्यास ठेवली होती. डाळ शिजवितानाच दोन शिट्या झाल्यानंतर कूकरचा स्फोट झाला. परिणामी हॉटेलला आगीने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच हॉटेलने पेट घेताच स्थानिकांनी सौंदत्ती अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. जखमींना तातडीने हुबळी व सौंदत्ती येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. सौंदत्ती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.









