7 विद्यार्थ्यांची हकालपट्टी : हिंदु संघटनांकडून संताप व्यक्त
वृत्तसंस्था/ ब्रह्मपूर
ओडिशाच्या ब्रह्मपूरमध्ये पराला महाराजा इंजिनियरिंग कॉलेजच्या 7 विद्यार्थ्यांना कथित स्वरुपात बीफ शिजविल्याप्रकरणी वसतिगृहातून काढून टाकण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यामुळे कॉलेज परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वसतिगृहात घडलेल्या या घटनेनंत हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
कॉलेजच्या वसतिगृहात 7 विद्यार्थ्यांनी कथित स्वरुपात बीफ शिजविले हेते. यानंतर विद्यार्थ्यांच्या अन्य समुहाने या घटनेची माहिती अधिष्ठात्यांना दिली. प्रतिबंधित कारवायांमध्ये सामील असल्याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा अधिष्ठात्यांनी केली आहे.
वसतिगृहात बीफ शिजविण्याच्या घटनेमुळे शांतता भंग झाली आहे. यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत सामील विद्यार्थ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कॉलेज प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कॉलेजला भेट देत आणि प्राचार्यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कॉलेज प्रशासनाने संबंधित आरोपांप्रकरणी चौकशी केली आहे. या चौकशीत आरोप सत्य असल्याचे समोर आल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.









