दुसरी क्रिकेट कसोटी, पावसाचा अडथळा, न्यूझीलंड 2 बाद 155
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंड आणि लंका यांच्यात येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत देवॉन कॉन्वेच्या समयोचित अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 2 बाद 155 धावा जमवल्या. खेळाच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्यामुळे केवळ 48 षटकांचा खेळ झाला.
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत ही कसोटी मालिका सुरू असून न्यूझीलंडने पहिला सामना जिंकून लंकेवर 1-0 अशी आघाडी यापूर्वी घेतल्याने भारताने विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम स्थान निश्चित केले. येथे गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने मैदान आणि खेळपट्टीवर खूपच पाणी साचले होते. त्यामुळे उपाहारापर्यंत खेळ होऊ शकला नाही. पंचांनी खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी करून उपाहारानंतर खेळाला परवानगी दिली. या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. दरम्यान वादळी वारा आणि पावसाळी वातावरण त्याचप्रमाणे अंधूक प्रकाशाच्या अडथळ्यामुळे पंचांनी पुन्हा खेळ शेवटच्या सत्रात लवकरच थांबवला.
ढगाळ वातावरणात लॅथम आणि कॉनवे यांनी संघाच्या डावाला सावध सुरुवात केली. या जोडीने 25.1 षटकात 87 धावांची भागीदारी केली. लंकेच्या रजिताने न्यूझीलंडची ही सलामीची जोडी फोडताना लॅथमला जयसुर्याकरवी झेलबाद केले. त्याने 73 चेंडूत 21 धावा जमवल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही 2500 वी कसोटी ठरली आहे. रजिताच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात लॅथम जयसुर्याकडे झेल देऊन तंबूत परतला. खेळपट्टीवर अधिक गवत असल्याने त्याचा फायदा लंकेच्या वेगवान गोलंदाजांना थोडाफार मिळाला. विलियम्सन आणि कॉनवे यांनी दुसऱ्या गड्यासाठी 31 धावांची भर घातली. कॉनवेने आक्रमक फलंदाजी करताना 108 चेंडूत 13 चौकारासह 78 धावा झळकवल्या. धनंजय डिसिल्वाने आपल्या गोलंदाजीवर कॉन्वेला टिपले. यावेळी डावातील 36 वे षटक चालू होते. विलियम्सन आणि निकोल या जोडीने उर्वरित 12 षटकात बचावात्मक फलंदाजी करत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 48 षटकात 2 बाद 155 धावा जमवल्या. विलियम्सन 3 चौकारासह 26 तर निकोल्स 1 चौकारासह 18 धावावर खेळत आहे. लंकेतर्फे रजिताने 42 धावात 1 तर डिसिल्वाने 18 धावात 1 गडी बाद केला. या दुसऱ्या कसोटीसाठी लंकन संघामध्ये यष्टीरक्षक डिक्वेलाच्या जागी निशान मधुशनकाला संधी देण्यात आली आणि त्याने या सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले. न्यूझीलंड संघामध्ये एक बदल करण्यात आला. जखमी वॅग्नरच्या जागी ब्रेसवेलला संधी देण्यात आली. अलीकडच्या कालावधीत न्यूझीलंड संघाने सलग दोन कसोटी सामने जिंकले असून आता ते तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव 48 षटकात 2 बाद 155 (लॅथम 21, कॉनवे 78, विलियम्सन खेळत आहे 26, निकोल्स खेळत आहे 18, अवांतर 12, रजिता 1-42, डिसिल्वा 1-158).









