वृत्तसंस्था / वेलिंग्टन
14 डिसेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज देवॉन कॉन्वे उपलब्ध होऊ शकणार नाही. या कसोटी दरम्यान त्याची पत्नी पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्याने तो या कसोटीत खेळू शकणार नाही, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले.
या कसोटी मालिकेत इंग्लंडने सलग दोन सामने जिंकले असून आता ते न्यूझीलंडचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कॉन्वेच्या अनुपस्थितीमुळे आता न्यूझीलंड संघात अष्टपैलु मार्क चॅपमनचा समावेश करण्यात आला आहे. सदर कसोटी हॅमिल्टनमध्ये खेळविली जाणार आहे. कॉन्वे चालु वर्षीच्या क्रिकेट हंगामात अधिक धावा जमवू शकलेला नाही. त्याने 9 कसोटीत केवळ 386 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंड संघ: लेथम (कर्णधार), ब्लंडेल, चॅपमन, डफी, हेन्री, मिचेल, ओरुरके, फिलीप्स, रचिन रविंद्र, सॅन्टेनर,स्मिथ, साऊदी, विलियमसन आणि यंग









