प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये खडतर प्रशिक्षण घेतलेल्या नॉन-कॉम्बिटंट प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा शनिवारी पार पडला. अग्निवीर प्रशिक्षणार्थींची दुसरी तुकडी प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी रुजू झाली. त्यामध्ये 218 अग्निवीर प्रशिक्षणार्थी जवानांचा सहभाग होता.
अग्निपथ योजनेंतर्गत गेल्या 30 जूनपासून बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर प्रशिक्षण सुरू होते. 24 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थी आता देशसेवेमध्ये रुजू होणार आहेत. या प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा शनिवारी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या मैदानात पार पडला. या कार्यक्रमाला बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे कमांडिंग ऑफिसर एअर कमोडोर एस. श्रीधर व्ही. एम. उपस्थित होते.
एअर कमोडोर एस. श्रीधर व्ही. एम. यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या ड्रिलची त्यांनी प्रशंसा केली. प्रशिक्षणादरम्यान उत्तम काम केलेल्या प्रशिक्षणार्थींचा सन्मान करण्यात आला. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना त्यांनी ज्ञान व कौशल्य वाढविण्याचे आवाहन केले.









