1800 प्रशिक्षणार्थी देशसेवेत रुजू
प्रतिनिधी/ बेळगाव
अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या चौथ्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शनिवारी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे पार पडला. 1800 हून अधिक अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींनी 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. एअर व्हाईस मार्शल प्रशांत शरद वडोदकर हे प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत सोहळ्याला उपस्थित होते. हे प्रशिक्षणार्थी आता देशसेवेमध्ये रुजू होणार आहेत.
प्रशिक्षणार्थींनी कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल एअर व्हाईस मार्शल प्रशांत वडोदकर यांनी अभिनंदन केले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना गौरविण्यात आले. अग्निवीर वायु प्रशिक्षणार्थी नितीनकुमार याला सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले. दीपिका हिला सर्वोत्तम महिला प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले. त्याचबरोबर नितीनकुमार याला अष्टपैलू प्रशिक्षणार्थीचा किताब देण्यात आला. सुहानी साहू हिला बेस्ट मार्कस्मन हा किताब देण्यात आला.
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वापर लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रभावीपणे होईल, असा विश्वास अधिकारीवर्गाने व्यक्त केला. या सोहळ्याला प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी कमांडिंग ऑफिसर तसेच एअरमन ट्रेनिंग स्कूलचे अधिकारी उपस्थित होते.









