2,675 जणांचा समावेश : लवकरच महिला तुकडीचेही प्रशिक्षण
प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून खडतर प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी जवान देशसेवेच्या रक्षणासाठी सैन्यात रुजू होत आहेत. 2 हजार 675 जवानांचा शनिवारी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या मैदानावर शानदार दीक्षांत सोहळा पार पडला. 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेतलेले हे अग्निवीर आता देशसेवेमध्ये रुजू होणार आहेत.
दीक्षांत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय हवाई दलाचे ट्रेनिंग कमांड विभागाचे एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ एअर मार्शल आर. राधिश उपस्थित होते. एअर मार्शलांच्या उपस्थितीत सर्व अग्निवीरांनी शानदार पथसंचलन करून मानवंदना दिली. एअर मार्शल राधिश यांनी सर्व अग्निवीर प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. आजवर वायु दलाने केलेल्या यशस्वी कामगिरींची माहिती दिली. वायु दलाची कीर्ती वाढेल असे काम अग्निवीरांनी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे 30 डिसेंबर 2022 पासून अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होते. स्त्राr-पुरुष समानता व महिलांचे सबलीकरण यासाठी भारतीय हवाई दलाने महिला उमेदवारांसाठी दारे खुली केली आहेत. या महिला उमेदवारांच्या प्रशिक्षणाला 28 जूनपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती या सोहळ्यात देण्यात आली.









