शिरोळ प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मारुती व्यकांप्पा मिरजकर रा. शेडशाळ, ता. शिरोळ यास पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, मारुती मिरजकर याने पिडीत मुलीच्या घरी जावून ता. २८. २. २०१८ रोजी तिच्याबरोबर अश्लिल चाळे करुन लैंगिक अत्याचार केला. याबाबत फिर्यादीने भा.द.वि.स. कलम ३५४, ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधि. २०१२ चे कलम ९ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. त्याप्रमाणे शिरोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३७ / २०१८ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविणेत आला होता. हा खटला जयसिंगपूरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जी. बी. गुरव यांच्या कोर्टात सुरु होता. सरकारी वकील उदय मोहन कुलकर्णी यांनी हे काम चालविले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हयाचा संपूर्ण तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुनम रूग्ये यांनी करून आरोपीविरुध्द दोषारोपपत्र पाठविले होते.
ही घटना घडल्यानंतर याची तक्रार पिडीत मुलीची आईने दिलेली होती. कोर्टाने झालेला साक्षीपुरावा व सरकारी वकिल उदय मोहन कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद व त्यांनी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयातील निवाडयाचा संदर्भ घेवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जी.बी. गुरव यांनी आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी व रु. २५०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.