छंगूरबाबा या भोंदूला अटक, हवेली केली धाराशायी
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंदू महिलांचे धर्मांतरण करण्याचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार जमालुद्दिन ऊर्फ छंगूरबाबा याला अटक करण्यात आली आहे. त्याची सहकारी नितू ऊर्फ नसरीन हिलाही अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जमालउद्दिन याने आरोप नाकारले असले, तरी त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे प्रतिपादन पोलिसांनी केले आहे. त्याला विदेशातून 105 कोटी रुपयांचे धन मिळाले असून त्याने या धनाचा उपयोग लव्ह जिहादसाठी केला. त्याने 1 हजाराहून अधिक हिंदू महिलांचे धर्मांतरण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्याला अटक केल्यानंतर आता उत्तर प्रदेश, तसेच अन्य राज्यांमधूनही त्याच्या विरोधात तक्रार सादर करण्यासाठी अनेक पिडित महिला आणि पुरुष पुढे येत आहेत. हा बाबा आणि त्याचा सहकारी बदर अख्तर सिद्दिकी यांनी आपल्या मुलीला दुबईत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून या दोघांनी तिचे लैंगिक शोषण केले असा आरोप एका कुटुंबाने केला असून तक्रार सादर झाली आहे.
बाबाच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश
जमालुद्दीन याने उत्तर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये आपले जाळे पसरले आहे. तो कोड वर्डच्या माध्यमातून आपल्या शेकडो हस्तकांची संपर्क करीत होता. आपल्या बेकायदेशीर कारवाया उघडकीस येऊ नयेत म्हणून त्याने नावांऐवजी कोडवर्डस् उपयोगात आणले आहेत. पैशाचे आमिष, विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन, शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन आणि विदेशी पर्यटनाची योजना अशा माध्यमांमधून त्याने हिंदू युवती, महिला आणि काही पुरुषांनाही इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी उद्युक्त केले आहे, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
पिडितांनी पुढे यावे
जमालुद्दीन याच्या आमिषांना फसून धर्मांतर केलेल्यांनी त्याच्या विरोधात तक्रारी सादर करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे असे आवाहन उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे. आतापर्यंत अनेक तक्रारी सादर झाल्या आहेत. पिडितांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. त्याने किती जणांना नादाला लावले, याचाही तपास केला जात असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी पिडितांच्या नातेवाईकांना दिले. पुढील तपास केला जात आहे.
अफाट मालमत्ता
आखाती देश आणि मुस्लीम देशांमधून त्याला मोठ्या प्रमाणावर पैसा पुरविण्यात आला असून त्याचाही तपास केला जात आहे. या पैशातून त्याने उत्तर प्रदेशात अनेक महागड्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या मालमत्ता जप्त करण्यात येतील् किंवा त्या नष्ट करण्यात येतील्। अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आलिशान कोठी धाराशायी
बलरामपूर येथे जमालुद्दीन याने सहा कोटी रुपये खर्च करून सरकारी जागेत अतिक्रमण करुन कोठी बांधली होती. ही कोठी स्थानिक प्रशासनाने पाडविली आहे. पाडविण्यापूर्वी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते, असे स्थानिक प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कोठी पाडवून सरकारी भूखंडावरचे त्याचे अतिक्रमण नष्ट करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.









