रामदुर्ग तालुक्यातील 18 लमाणी तांड्यांवर दबाव, नागरिक एकवटले, बालविकास अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील लमाणी तांड्यातून मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू आहे. आजारी व्यक्तींच्या कुटुंबीयांना धर्मांतर केलात तर आजार बरा होईल, अशी अंधश्रद्धा पसरवत धर्मांतर करण्यात येत असून तालुक्यातील अठरा तांड्यात हा प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. अंगणवाड्यांच्या माध्यमातून ओबळापूरसह वेगवेगळ्या तांड्यांमध्ये धर्मांतर करण्यात येत असून या कृत्याविरुद्ध तांड्यातील नागरिक एकवटले आहेत. तांडा संरक्षण मंचचे अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी यासंबंधी मिशनऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. रामदुर्ग तालुका बालविकास अधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आले आहे. ओबळापूरसह वेगवेगळ्या तांड्यांमध्ये धर्मांतराचा प्रकार सुरू आहे. ओबळापूर येथील अंगणवाडीत काम करणाऱ्या एका महिलेने सुरुवातीला धर्मांतर केले होते. आता तिच्या पुढाकारातून अंगणवाडीत दाखल होणाऱ्या मुलांच्या पालकांचा धर्म बदलण्यात येत आहे. तांड्यांमध्ये धर्मसभा व प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात येत आहे.एक वर्षापूर्वीच आपण यासंबंधी रामदुर्ग पोलिसांना तोंडी माहिती दिली होती, असेही शंकर चव्हाण यांनी सांगितले आहे. अंगणवाडीत काम करणाऱ्या सुमित्रा नामक महिलेवर तक्रार करण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी ओबळापूर तांड्यातील एका प्रमुखाचे निधन झाले होते. संपूर्ण तांड्यातील नागरिक त्या प्रमुखाच्या घरासमोर एकत्र आले होते. सर्व जण दु:खात होते. त्याचवेळी धर्मांतरित झालेली काही कुटुंबीय तांड्यापासून जवळच प्रार्थनासभा घेत होते. याची माहिती मिळाल्यानंतर तांड्यातील इतर नागरिकांनी त्या परिसरात धाव घेऊन त्यांना जाब विचारला. गावच्या व समाजाच्या प्रमुख व्यक्तीचे निधन झाले आहे. संपूर्ण तांड्यातील नागरिक दु:खात असताना तुमचे काय सुरू आहे? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी आम्ही प्रार्थना करतो आहे, असे धर्मांतरितांनी सांगितल्यानंतर धर्मांतर शिक्कामोर्तब झाले आहे. तांड्यातील अनेकांच्या घरातील फोटोही बदलले आहेत. दरवाजा, प्रवेशद्वारावर इंग्रजीमध्ये संदेश लिहिण्यात आले आहेत.
अंधश्रद्धेचे बळी?
तांड्यातील काही जण वातावरण बदलामुळे आजारी पडले आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा उठवून ‘तुम्ही जर धर्म बदललात तर तुमचे आजार आपोआप बरे होतील’, अशी अंधश्रद्धा पसरवून त्यांचा धर्म बदलण्यात आला आहे. तर आणखी काही जणांना धर्मांतरासाठी ठरावीक रकमेचे आमिष दाखविण्यात आले आहे. केवळ ओबळापूरच नव्हे तर तालुक्यातील अठरा तांड्यांमध्ये धर्मांतर सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. कर्नाटकात धर्मांतर बंदीचा कायदा आहे. त्याला मूठमाती देऊन मोठ्या प्रमाणात धर्म बदलण्याचा उद्योग करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.









