सतेज पाटील – महाडिक यांच्यात होणार अटीतटीचा सामना
शिवारात जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटीगाठी
कोल्हापूर/कृष्णात चौगले
कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून माजी पालकमंत्री, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यामधील पुन्हा एकदा तुल्यबळ लढत पहावयास मिळणार आहे. आजतागायत झालेली विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा अथवा गोकुळची निवडणूक असो. प्रत्येक निवडणुकीमध्ये महाडिक-पाटील गटात अटीतटीचा सामना झाला आहे. आता ‘राजाराम’च्या निवडणुकीतून पुन्हा महाडिक-पाटील भिडणार असून जिह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 23 एप्रिलला मतदान होणार असले तरी गेल्या महिनाभरापासून दोन्ही गटांकडून सभासदांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरु आहेत.
सन 1938 साली स्थापन झालेल्या या कारखान्याचे साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असून 122 गावांचा समावेश आहे. 13 हजार 409 अ वर्ग सभासद असून 129 ब वर्ग सभासद आहेत. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे प्रचाराला वेग आला असून महाडिक-पाटील गटाचे कार्यकर्त्यांनी प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले आहे. तरीही जिल्हा पातळीवरील राजकारणातून कोण कोणासोबत असणार ? याच्यावर निकाल स्पष्ट होणार आहे. गत निवडणुकीत जनसुराज्यचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांनी आमदार सतेज पाटील यांना साथ दिली होती. त्यावेळी पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलचे उमेदवार सव्वाशे ते अडीचशे मतांनी पराभूत झाले होते. गतवर्षी महाडिक यांच्यासोबत असलेले कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने सध्या आमदार पाटील यांच्यासोबत आहेत.
कारखान्याचे कार्यक्षेत्र करवीरसह हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी व कागल तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर व हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक मते आहेत. त्यामुळे हातकणंगले तालुक्यावर महाडिक यांचे विशेष लक्ष राहणार आहे. गतविधानसभा निवडणुकीनंतर जनसुराज्य पक्ष हा भाजपचा सहयोगी पक्ष बनला असून सद्यास्थितीत ते भाजपसोबत आहेत. तसेच संपूर्ण महाडिक कुटुंबीय भाजपमय झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार कोरे कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. हातकणंगले व करवीर तालुक्यात सर्वाधिक मतदार असून हे दोन तालुके निर्णायक ठरणार आहेत. गेल्या निवडणुकीत महाडिक यांना हातकणंगले तालुक्याचे भक्कम पाठबळ मिळाले. तर करवीरसह कसबा बावड्यातील सर्वाधिक सभासदांनी पाटील यांना झुकते माप दिले होते. या निवडणुकीत प्रारूप यादीनंतर पात्र झालेले 985 सभासदांसह वाढवलेल्या सभासदांचा कारखान्याच्या निकालावर ‘इफेक्ट’ होण्याची शक्यता आहे.
पी.एन.पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सत्ताधारी आघाडीला साथ दिली. या निवडणुकीत आमदार पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीमधील अनेक उमेदवारांचा अगदी दीडशे ते दोनशे मतांनी काठावरचा पराभव झाला. हा पराभव पी.एन.पाटील गटातील कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे राजारामच्या निवडणुकीत पी.एन.पाटील कोणती भूमिका घेतात ? हे देखील महत्वाचे ठरणार आहे.
प्रचाराचे परफेक्ट नियोजन
कोणत्या गावात किती सभासद आहेत ? कोणत्या कार्यकर्त्यांने किती सभासदांची जबाबदारी स्वीकारायची ? त्यांचा कौल काय आहे ? त्यांचे मतदान आपल्याच पारड्यात पडावे यासाठी काय करायला हवे ? याची परिपूर्ण जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यासह माजी आमदार अमल महाडिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. त्यानुसार दररोज सभासदांच्या वैयक्तिक भेटीगाठी सुरु आहेत. आमदार सतेज पाटील यांनी तर प्रचाराचे कंट्रोल आपल्याच हातात ठेवले असून आमदार ऋतुराज पाटील यांचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. तसेच माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, जि.प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनीही सभासदांच्या वैयक्तिक भेटींवर जोर दिला आहे.
करवीर, हातकणंगले तालुक्यात निर्णायक मतदान
करवीरसह हातकणंगले, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा हे पूर्ण तालुके तर कागल तालुका अर्धा असे कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. कारखान्याच्या एकूण 13 हजार 409 सभासदांपैकी तब्बल 10 हजार 747 सभासद हातकणंगले व करवीर तालुक्यात आहेत. त्यामुळे हे दोन तालुके या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहेत.