वृत्तसंस्था / चेन्नई
‘सनातन धर्म’ हा समानतेच्या तत्वाच्या विरोधात असून तो सामाजिक न्याय नाकारणारा धर्म आहे. तो कोरोना, डेंग्यू, मलेरिया आदींच्या विषाणूंप्रमाणे आहे. या विषाणूंचा जसा नाश करण्यात आला, तसा या धर्माचाही होणे आवश्यक आहे, अशी भडकाऊ भाषा तामिळनाडूचे मंत्री आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता हा वाद चिघळला आहे.
आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला. हिंदू समाजाला दुखाविण्याचा आपला हेतू नव्हता, अशी सारवासारवी करण्याचाही त्यांनी प्रयत्न नंतर केला. तथापि, त्यांच्या प्रक्षोभक आणि अनाठायी टिप्पणीमुळे विरोधकांचीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांनी ‘हे त्यांचे व्यक्तीगत मत आहे’ असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने हा वाद वाढत जाण्याची चिन्हे आहेत.
10 कोटीचे इनाम
सनातन धर्माचा अकारण अपमान करणाऱ्या या व्यक्तीचे शीर कापणाऱ्यास 10 कोटी रुपयांचे इनाम अयोध्येतील एक संत परमहंस आचार्य यांनी घोषित केले आहे. मात्र, आपण आपल्या विधानाशी ठाम आहोत. सनातन धर्माने महिलांवरही अन्याय केला आहे. त्यांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली होती. मात्र, आता महिला घराबाहेर पडून शिक्षण घेत आहेत आणि सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करीत आहेत, अशीही आणखी एक टिप्पणी त्यांनी केली आहे.
शनिवारी मी जे बोलले ते पुन्हा पुन्हा बोलत राहीन. त्याहीपेक्षा जास्त बोलत राहीन. माझ्या बोलण्यामुळे अनेकजण दुखावले जातील, हे मी पहिल्या दिवशीच स्पष्ट केले होते. सनातन धर्म अपरिवर्तनीय असल्याने त्यात सुधारणा होऊ शकत नाही. केवळ द्रविडम विचारसरणीमुळेच महिलांना न्याय मिळाला आहे, अशीही टिप्पणी त्यांनी केली. त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापणार आहे.
भाजपची कठोर टीका
आपली कर्तृत्वशून्यता आणि अकार्यक्षमता लपविण्यासाठी उदयनिधी स्टॅलिन अशी भडकाऊ विधाने करीत आहेत. त्यांना सनातन धर्म या संकल्पनेचा अर्थच समजलेला नाही. तो समजून घेण्याची त्यांची क्षमताही नाही. केवळ वाचळपणा करुन ते वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी कठोर टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. ‘त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. कारण, त्यांच्या या बिनबुडाच्या आणि निरर्थक वक्तव्यांमुळे सनातन धर्म अधिक बळकट होणार असून सर्वसामान्यांचा सनातन धर्मासंबंधीचा आदर वाढणार आहे. विरोधी पक्षांची अधिक गोची होणार आहे, अशी खोचक प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी व्यक्त केली आहे.









