रत्नागिरी प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या ६व्या टप्प्यातील १५९ शिक्षकांच्या बदल्यानंतर सोईच्या मिळाल्याने शिक्षक पुन्हा त्या-त्या मध्ये हजर झाले आहेत. त्यामुळे या -शाळांमध्ये यापूर्वी रिक्त जागांवर नियुक्त केलेल्या तात्पुरत्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश काढण्यात आल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पुढील २ दिवसात मानधनावर नेमलेल्या तात्पुरत्या शिक्षकांना घरी बसावे लागले, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या सहाव्या टप्प्यातील बदल्यांबाबत झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाने नमती भूमिका घेतली होती. बदली झालेल्या १५९ शिक्षकांनी या शाळेवर जाण्यास नकार दिला होता. यातील ४४ शिक्षक हे न्यायालयात गेले आहेत. त्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. या बदल्या झालेल्या शिक्षकांनी आक्षेप घेतल्यानंतर पूर्वी झालेल्या बदल्या रद्द करून १५९ शिक्षकांना सोईच्या शाळा समूपदेशनाने देण्यात आल्या आहेत. पण त्यामुळे १५ दिवसांपूर्वी प्राथमिक शाळांवरील शिक्षकांच्या रिक्त जागांवर मानधनावर नव्याने नियुक्ती केलेल्या तात्पुरत्या शिक्षकांना फटका बसला आहे. नेमलेल्या त्या शेकडो शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शाळांवरील रिक्त जागी सध्या ६८४ तात्पुरते शिक्षक नेमण्यात आले होते. सहाव्या टप्यातील बदली प्रक्रियेनंतर सोमवारी ज्या शाळेत या बदलीने शिक्षक हजर झाले, त्या जागेवर नेमलेल्या तात्पुरते शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. वास्तविक आंतरजिल्हा बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट बनली होती. अनेक ठिकाणी शिक्षकच नसल्याने त्यावर तात्पुरत्या मानधनावर शिक्षक नियुक्तीचा इलाज करण्यांत आला होता. त्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठबळ देत महिन्याला ९ हजार रुपये मानधन देण्याच्या सूचना केल्यानंतर मानधनावर शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग आला. जिल्ह्यात सुमारे ७०० शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती.









