भाजपकडून जोरदार निदर्शने ः तृणमूलला महुआ यांनी केले अनफॉलो
वृत्तसंस्था / कोलकाता
काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून सुरू असलेला वाद आता राजकीय संघर्षात रुपांतरित झाला आहे. चित्रपटनिर्मात्याच्या समर्थनार्थ तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात भाजपने बुधवारी कोलकात्यामध्ये निदर्शने केली आहेत. तसेच भाजपकडून कोलकात्यातील एका पोलीस स्थानकात महुआ यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. अन्य राज्यांमध्येही महुआ यांच्या विरोधात तक्रारींची नोंद झाल्याने त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.
महुआ यांचे विधान चुकीचे आहे. नुपूर शर्मा यांच्याप्रमाणे महुआ यांच्या विरोधातही ममता बॅनर्जी सरकारने लुकआउट नोटीस जारी का केली नाही अशी विचारणा भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी केली आहे. तर महुआ यांच्या वक्तव्यापासून तृणमूल काँग्रेसने अंग झाडले आहे. महुआ यांचे विधान वैयक्तिक स्वरुपाचे असून याच्याशी पक्षाचे कुठलेच देणेघेणे नसल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. तसेच महुआ यांनी तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर अकौंटला अनफॉलो केले आहे. तृणमूल काँगेसने घेतलेल्या भूमिकेमुळे महुआ नाराज झाल्याचे यातून दिसून येते.
खासदार मोइत्रा यांनी स्वतःच्या विधानासाठी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. भाजप महिला मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘महुआ मोइत्रा विरोधात घोषणाबाजी करत त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. कोलकाता शहरात महुआ यांच्या विरोधात जोरदार निदर्शने झाली आहेत. महुआ मोइत्रा यांच्या विधानाबद्दल ममता बॅनर्जी यांनी मतपेढी गमवावी लागेल या भीतीपोटी एक शब्दही तोंडातून काढला नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये काली या मातेच्या ठिकाणी असून त्यांच्याबद्दल असे बोलणे आम्ही सहन करणार नसल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
ममतांकडून केवळ ड्रामा
महुआ यांनी हिंदू देवतेचा अपमान केलाहे. ममता बॅनर्जी या केवळ हिंदू असल्याचा ड्रामा करतात. महुआ यांच्या वादग्रस्त विधानावर त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. ममता बॅनर्जी या खरोखरच हिंदू असतील तर त्यांनी महुआ मोइत्रा विरोधात कारवाई करत त्यांना अटक करावी असे आव्हान भाजपकडून देण्यात आले आहे.
महुआ यांचे वादग्रस्त विधान
एका कार्यक्रमात बोलताना महुआ यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले होते. तुम्ही देवाकडे कसे पाहता हे तुमच्यावर अवलंबून असते. जर तुम्ही भूतान किंवा सिक्कीमला गेला तर देवाला व्हिस्कीचा नैवैद्य दाखविला जातो. तर उत्तरप्रदेशात कुणाला प्रसादात व्हिस्की दिल्यास त्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. माझ्यासाठी काली माता एक मांस सेवन करणारी आणि मद्यप्राशन करणारी देवी आहे. कालीमातेची अनेक रुपं असल्याचे महुआ यांनी म्हटले होते.
तृणमूल काँग्रेसची अडचण
पश्चिम बंगालमधील हिंदूंमध्ये सर्वाधिक श्रद्धा कालीमाता आणि दुर्गामातेबद्दलच आहे. तेथील कालीघाट मंदिर देशभरातील 51 शक्तीपीठांमध्ये सामील आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात 70.54 टक्के हिंदू लोकसंख्या आहे. याचाच अर्थ हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याने गेल्याने तृणमूल काँग्रेस अडचणीत येऊ शकतो. अशा स्थितीत हिंदूंचे आराध्य असलेल्या कालीमातेसंबंधीच्या वादग्रस्त पोस्टरचे समर्थन करणे कुठल्याही पक्षासाठी आत्मघाती पाऊल ठरणार आहे. तर महुआ यांच्या विधानानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने तृणमूल काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले आहे.









