वृत्तसंस्था / तवी दिल्ली
नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोठा विजय झाला होता. तर काँग्रेसप्रणित एनएसयुआय या संघटनेचा पराभव झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी तीन पदे पटकाविली होती. तर एनएसयुआयच्या वाट्याला केवळ उपाध्यक्ष हे एकच पद आले होते. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या आपली शक्ती उपयोगात आणली होती. आता पराभूत झालेल्या एनएसयुआय या संघटनेने हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात नेले आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या माध्यमातून मतदान झाले होते. या यंत्रात घोटाळा करण्यात आला आहे, असा एनएसयुआय या संघटनेचा आरोप आहे. तथापि, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा आरोप नाकारला असून पराभवामुळे एनएनयुआय ही काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना निराश झाली असून आता ती यंत्रांमध्ये आपल्या परावभाची कारणे शोधत आहे, अशी खोचक टिप्पणी या संघटनेने केली आहे.. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी केल्यानंतर या निवडणुकीत उपयोगात आणली गेलेली सर्व यंत्रे सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच दिल्ली विद्यापीठ आणि त्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस पाठविली आहे. पुढील सुनावणी लवकरच होईल.









