काँग्रेसवर भडकला भाजप : पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या दिवंगत मातेच्या अपमानाचा आरोप
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रेदरम्यान काँग्रेसच्या व्यासपीठावरुन पंतप्रधान मोदींच्या आईला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. आता बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या एआय जनरेटेड व्यक्तिरेखांच्या व्हिडिओवर राजकीय वाद उभा ठाकला आहे. या एआय व्हिडिओप्रकरणी भाजपने काँग्रेस विरोधात संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. काँग्रेस आता एआय तंत्रज्ञानाचा गैरवार करत पंतप्रधानांच्या मातेचा अपमान करत आहे. हा प्रकार मानसिक दिवाळखोरी आणि काँग्रेसच्या हीन मानसिकतेचा पुरावा आहे. हा देशाच्या प्रत्येक मातृशक्तीचा अपमान आहे. काँग्रेससाठी आता संस्कार महत्त्वाचे राहिलेले नाहीत हे यातून स्पष्ट होते. परंतु बिहारची भूमी मातेचा अपमान करणाऱ्यांना कधीच माफ करणार नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी संताप व्यक्त केला.
एआय जनरेटेड व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातेचा अपमान काँग्रेसने केला आहे. काँग्रेस आणि राजदने न सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बिहारची जनता यावेळी देखील राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना सुधारणार आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या निर्देशावरच पंतप्रधान आणि त्यांच्या मातेला वारंवार अपमानित केले जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केला.
या व्हिडिओत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत माता हीराबेन यांच्यात एक काल्पनिक संवाद दाखविण्यात आला आहे. भाजपने याला पंतप्रधान आणि त्यांच्या मातेचा अपमान ठरवत काँग्रेसकडून माफीची मागणी केली आहे.
काँग्रेसकडून सारवासारव
या व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदींच्या दिवंगत मातेचा अपमान होत नसल्याची सारवासारव काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केली आहे. भाजप प्रत्येक गोष्टीला राजकीय स्वरुप देत सहानुभूमी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी हे राजकारणात असून त्यांना या व्हिडिओद्वारे सल्ला देण्यात आल्याचा दावा खेडा यांनी केला आहे.









