डायरीमुळे गेहलोत अडचणीत येणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानात सध्या लाल डायरी चर्चेत आली आहे. हा मुद्दा राजस्थान सरकारमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत मंत्री राहिलेले राजेंद्र गुढा यांच्याशी संबंधित आहे. स्वत:च्याच सरकारवर टीका केल्यावर गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील उदयपूरवाटीचे आमदार गुढा हे सोमवारी विधानसभेत लाल डायरी घेऊन पोहोचले, यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.
गुढा यांना प्रारंभी विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. सभागृहात पोहोचल्यावर गुढा यांनी सभापती सी.पी. जोशी यांच्यासमोर लाल डायरी झळकविण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या सभापतींनी मार्शल्सना आदेश देऊन गुढा यांना सभागृहातून बाहेर काढले. या लाल डायरीत आमदारांच्या घोडेबाजाराचा पूर्ण तपशील असल्याचा दावा गुढा यांनी केला आहे.
ही लाल डायरी माझ्याकडून हिसकावून घेण्यात आली. या डायरीत अशोक गेहलोत सरकारशी निगडित महत्त्वपूर्ण माहिती आहे. गेहलोत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांच्या घरी छापे टाकण्यात आले तेव्हा गेहलोतांच्या सुचनेनुसार ही डायरी मी तेथून आणली होती. लाल डायरी तेथून आणली नसती तर गेहलोत आज तुरुंगात असते. आमदारांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी गेहलोतांनी त्यांना काय-काय दिले याचा पूर्ण तपशील या डायरीत असल्याचा दावा गुढा यांनी केला आहे.
या लाल डायरीत नेमकं काय आहे अशी विचारणा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना केली आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काही काळापूर्वी गेहलोत यांच्या विरोधात जात काही आमदारांना स्वत:सोबत घेत पक्षात बंड केले होते. त्या कालावधीत गेहलोत यांनी अनेक आमदारांना विविध गोष्टी पुरवून स्वत:च्या बाजूने वळविल्याचा आरोप गुढा यांनी केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.