सातारा :
शासकीय जागेवरून स्टेट्स ठेवल्याने जकातवाडी (ता. सातारा) या गावात गुरूवारी दुपारी दोन गटात हाणामारी झाली. यात दोघे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकांना ताब्यात घेतले. कवितांचे गाव तसेच विधवेला सन्मान देणारे पहिले गाव असे अनेक उपक्रम राबवणारे उपक्रमशील जकातवाडीची ओळख राज्यभर झाली आहे. परंतु अनेक दिवसांपासून निवडणूक तसेच इतर कारणावरुन जकातवाडी धुमसत होती. स्टेटस ठेवल्याच्या निमित्ताने त्याचे पर्यवसन गुरूवारी दोन गटात हाणामारीत झाले.
जकातवाडी गावात एका समाजाची घरे बांधण्यासाठी शासनाकडून जागा देण्यात आली आहे. या जागेवर घरे बांधण्यात येऊ नये म्हणून दुसऱ्या समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अडवणूक करण्यात येत आहे. याबाबत गावातील एक युवकाने स्टेट्स ठेवला. हा स्टेट्स पाहून काही लोकांना राग आला. या युवकाला मारायचे असे त्यांनी ठरवले. सुरूवातीला शाब्दीक वाद सुरू झाला. नंतर दोन समाजातील युवकांनी इतर युवकांना एकत्र केले. हे एकमेकांसमोर येताच दांडक्याने, दगडाने मारामारी सुरू झाली. काहींनी कोयत्यानेही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा वाद शांत करण्यासाठी दोन्ही गटातील काही युवकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण
गेल्या दोन वर्षापुर्वी जकातवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीवरून वाद सुरू झाला. या वादाचा राग मनात धरून सतत वाद होत आहेत. या वादातून शाब्दीक वाद विकोपाला जात आहेत. असाच स्टेट्स ठेवल्यावरून वाद गुरूवारी दुपारी सुरू झाला. परंतु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ घडला नाही.








