विहिंपसह हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप : शाळा व्यवस्थापनाकडून माफी व्यक्त,प्राचार्य शंकर गांवकर अखेर निलंबित
वास्को : झुआरीनगरातील एका मशिदीत विद्यार्थ्यांना नमाज पठण, हिजाब व इतर इस्लामिक रितीरिवाज करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप वास्कोतील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रश्नावर सोमवारी दुपारी दाबोळीतील केशव स्मृती शिक्षण संस्थेत काही तास तणाव झाला. परिणामी शाळा व्यवस्थापनाला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांना सेवेतून निलंबित करावे लागले. यासंबंधी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रारही नोंदवली आहे. अधिक माहितीनुसार आल्त दाबोळीतील केशव स्मृती शिक्षण संस्थेच्या उच्च माध्यमिक शाळेतील 22 विद्यार्थी, विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी झुआरीनगरातील मशिदीमध्ये प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी घेऊन गेले होते. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये करण्यात येणाऱ्या इस्लामिक रितीरिवाजांचे पालन करावे लागले. त्यांना हिजाव करावा लागला. नमाज पठणही करावे लागले, असा आरोप आहे. या मशिद दर्शनाचे बरेच फोटो गेल्या दोन दिवसांत व्हायरल झाले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला आहे.
पालक, कार्यकर्ते संतप्त
मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच काही विद्यार्थ्यांचे पालक या शाळेत काल सोमवारी जमा झाले. शिक्षक व विद्यार्थी वर्गात व्यस्त असतानाच हा प्रकार घडला. मात्र, शाळेतील वर्ग सुरळीत राहिले. या कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापक, प्राचार्य तसेच मुख्याध्यापिका यांना मशिदीत विद्यार्थ्यांना पाठवून तिथे विद्यार्थ्यांबाबत घडलेल्या प्रकारासंबंधी जाब विचारला. या प्रकाराबाबत स्पष्टीकरण द्यावे तसेच जे कुणी यात गुंतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर शाळेच्या आवारात बराच वेळ हंगामा झाला. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीसही या शाळेत दाखल झाले.
प्राचार्य गावकर निलंबित
एकंदरीत या प्रकाराचा परिणाम म्हणून या शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक पांडुरंग कोरगावकर यांनी उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य शंकर गावकर यांना सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढला. त्यामुळे या वादावर तात्पुरता पडदा पडला.
विहिंपकडून पोलीस तक्रार
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वास्को पोलीस स्थानकात सदर प्राचार्याविरूद्ध तक्रार देऊन या प्रकरणाच्या चौकशीची व कारवाईची मागणीही केली आहे. या घटनेसंबंधी अधिक खुलासा करताना ते म्हणाले की, मशिद दर्शनासाठी ज्या स्टुडण्टस् इस्लामिक ऑर्गनायझेशनने विद्यार्थ्यांना बोलावले होते, त्यांचे व्यवहार संशयास्पद असून या मशिद दर्शनात विद्यार्थी विद्यार्थिनींना चुकीचे मार्गदर्शन झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
केशव स्मृती शिक्षण संस्थेला यासंबंधी जाब विचारायला दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मशिदीत घेऊन जाण्याचा प्रकार शैक्षणिक नियमांना धरून नव्हता. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर होती. त्यामुळे योग्य कारवाई व्हायलाच हवी. या विद्यार्थ्यांमध्ये हिंदू व ख्रिश्चन मुलामुलींचा समावेश होता. या अल्पवयीन मुलांना शाळेच्या प्राचार्यानी सकाळची प्रार्थना संपल्यावर बाहेरच्या बाहेर एक शिक्षक व सहाय्यकासह मशिदीत नेले व पुढे चुकीचा प्रकार घडला. प्राचार्याने शाळा व्यवस्थापनालाही विश्वासात घेतले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले व या प्रकाराला पूर्णपणे प्राचार्य जबाबदार असल्याचा दावा केला. असा प्रकार अन्य कुठेच घडता कामा नये यासाठी कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घडलेल्या प्रकाराचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे श्याम नायक, संजू कोरगावकर, प्रशांत हळदणकर तसेच प्रितम नाईक, परशुराम शेट्यो, किरण नाईक, बलराम बेटगीरी, परशुराम गणाचारी व इतर बऱ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी सोमवारी संध्याकाळी वास्को पोलिसांनी शाळा व्यवस्थापन व इतर संबंधितांना बोलावले होते.
शाळा व्यवस्थापकांची माफी
शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक पांडुरंग कोरगावकर यांनी यासंबंधी माध्यमांकडे बोलताना सांगितले की, प्राचार्य शंकर गावकर यांनी विद्यार्थ्यांना घेऊन जाताना आम्हाला माहिती दिली नव्हती. त्यामुळे शाळेकडून ही मोठी चूक झालेली असून या चुकीबद्दल आपण माफी मागत असल्याचे स्पष्ट केले. शिवाय प्राचार्याला निलंबित करण्यात आल्याचेही ते म्हणाले. एका इस्लामिक संघटनेने मशिद दर्शनासाठी चांगला हेतू विशद करून विद्यार्थ्यांना पाठवण्यात यावे, अशा आशयाचे पत्र उच्च माध्यमिक शाळेला दिले होते. त्यानुसार मुले मशिदीत गेली होती अशी माहितीही त्यांनी दिली.









