नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी एका धर्मांतराच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने वादंग निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाने या मंत्र्याला काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे केली आहे. आम आदमी पक्षाचे खरे स्वरुप या घटनेमुळे जनतेसमोर आले अशी टीका भाजपने केली. 5 ऑक्टोबरला हा धर्मांतराचा कार्यक्रम झाला. त्याचे व्हिडीओ चित्रण सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात साधारणतः 10 हजार हिंदूंनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा कार्यक्रमाला आम आदमी पक्षाच्या मंत्र्याची उपस्थिती त्या पक्षाला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल हे गौतम यांच्यावर अतिशय नाराज आहेत, असे आपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप गौतम यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
हिंदूंच्या भावना दुखावल्या
या कार्यक्रमात हिंदू देवतांसंबंधी अपमानास्पद विधाने करण्यात आली. हिंदू देवतांना न मानण्याच्या प्रतिज्ञा घेण्यात आल्या. आपचे मंत्री गौतम यांनीही हिंदू देवतांचा अवमान करणारी विधाने केली. हे सर्व चित्रण प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते गौतम भाटिया यांनी केला आहे. गौतम यांनी कार्यक्रमात केलेली टिप्पणी ही हिंदू धर्माचा तिरस्कार करणारी होती, असेही प्रतिपादन भाटिया यांनी केले.
दसऱयादिवशीच कार्यक्रम
दिल्लीच्या करोलबाग परिसरात हा कार्यक्रम हिंदूंचा महत्वाचा सण असणाऱया दसऱयादिवशीच आयोजित करण्यात आला होता. त्याला 10 हजाराहूंन अधिक लोकांची उपस्थिती होती. आपचा मंत्री या कार्यक्रमात सहभागी होण्यातून या पक्षाला हिंदू धर्मासंबंधी किती द्वेष आहे, हेच स्पष्ट होते. लोकही आम आदमी पक्षाला या हिंदुद्वेष्टेपणासाठी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. या पक्षाला या अपमानाची किंमत भोगावी लागेलच, अशी टीका दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केली. एकंदर हे धर्मांतर प्रकरण आम आदमी पक्षाला अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे, असे मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.









