मुख्यमंत्री विजयन यांचा दूरदर्शनवरील प्रसारणाला विरोध
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून पुन्हा एकदा वाद उभा ठाकला आहे. यावेळी वादाचे कारण याचे टीव्हीवरील प्रसारण आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दूरदर्शनवर याच्या प्रसारणाला विरोध दर्शविला आहे. दूरदर्शनकडून ध्रूवीकरणाला बळ देणारा चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ प्रसारित करण्याचा निर्णय घेतला जाणे अत्यंत निंदनीय आहे. राष्ट्रीय वृत्त प्रसारकाने भाजप-संघाची प्रचारयंत्रणा ठरू नये असे विजयन यांनी म्हटले आहे.
केरळ द्वेष फैलावण्याचे उद्देशपूर्ण प्रयत्नांना दृढतेने विरोध करत राहणार असल्याचे विजयन यांनी नमूद केले आहे. काँग्रेस पक्षाने देखील द केरळ स्टोरी चित्रपट दूरदर्शनवर प्रसारित करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तसेच याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा हा चित्रपट मागील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हादेखील या चित्रपटावरून मोठा वाद उभा ठाकला होता. विरोधी पक्षांनी याच्या विरोधात भूमिका मांडली होती. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाचे शो होऊ दिले गेले नव्हते. तसेच केरळ सरकारने या चित्रपटावर बंदी घातली होती.
हा चित्रपट दहशतवाद आणि धर्मांतरावर आधारित होता. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली होती. केरळमध्ये सुमारे 30 हजार युवती बेपत्ता झाल्याचा दावा चित्रपटात करण्यात आला होता. या युवतींना कट्टरवादी गटाने दिशाभूल करत दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये सामील करविले असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले होते. चित्रपटात अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली होती.
केरळमध्ये एकाच टप्प्यात 20 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये यंदा सत्तारुढ डावी आघाडी, काँग्रेस आणि भाजप यांच्यातच प्रामुख्याने त्रिकोणी लढत होणार आहे.









