आसाममध्ये काँग्रेस नेत्याला अटक : भाजपकडून राहुल यांना सवाल
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
हिंदू धर्म आणि संतांसंबंधी अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार अफताबुद्दीन मोल्लाह यांना अटक करण्यात आली आहे. मोल्लाह यांना गुवाहाटीमध्ये आमदार वाजिद अली चौधरी यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. दिसपूर पोलीस स्थानकात काँग्रेस आमदारच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक जी.पी. सिंह यांनी दिली आहे.
अफताबुद्दीन हे जालेश्वर मतदारसंघाचे आमदार आहेत. अफताबुद्दीन यांनी 4 नोव्हेंबर रोजी गोलपारा जिल्ह्यातील एका जाहीर सभेत पुजारी, नामघरिया आणि संतांविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. अफताबुद्दीन यांच्या भाषणाचा संदर्भ देत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने अफताबुद्दीन यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
जेथे हिंदू असतात, तेथे गैरप्रकार होतात. मंदिराचे पुजारी आणि नामघरचे केयरटेकर हे गैरकृत्यांमध्ये सामील असतात असे वक्तव्य अफताबुद्दीन यांनी केले होते. आसामच्या धेमाजी जिल्ह्यात नामघरिया नावाचे गाव असून येथील लोकांना नामघरिया म्हणून ओळखले जाते. नामघरिया लोक वैष्णव पद्धती उपासना होत असलेल्या धार्मिक ठिकाणांच्या देखभालीची जबाबदारी सांभाळतात. अशा स्थितीत अफताबुद्दीन यांच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
काँग्रेसकडून नोटीस
आसाम काँग्रेस अध्यक्ष भूपेन बोरा यांनी आमदार आफताबुद्दीन विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. जाहीरसभेत पुजारी, नामघरिया आणि संतांविषयी आफताबुद्दीन यांनी केलेल्या वक्तव्याची आसामच्या लोकांनी निंदा केली आहे. काँग्रेस पक्ष अशाप्रकारच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. आफताबुद्दीन यांनी स्वत:चे वक्तव्य मागे घ्यावे आणि प्रसारमाध्यमांसमोर येत माफी मागावी असे बोरा यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसने अद्याप आमदाराला झालेल्या अटकेप्रकरणी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
भाजप आक्रमक
सनातन धर्माला संपवू पाहणारी इंडिया आघाडी आता हिंदू संतांना लक्ष्य करत आहे. स्टॅलिन यांच्यापासून मोल्लाहपर्यंत कुठल्याही मौलवी किंवा पाद्रीविषयी असे बोलण्याची हिंमत आहे का? अखेर हिंदूंवरच का सातत्याने हल्ले केले जात आहेत. हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचविण्याचे काम इंडिया आघाडी करत आहे. प्रभू श्रीराम, राम मंदिर आणि रामचरितमानस आणि आता साधूंना लक्ष्य करण्यात आले आहे. केवळ मतपेढीसाठी काँग्रेसकडून हा प्रकार सुरू आहे. राहुल गांधी हे काँग्रेस आमदाराच्या विरोधात कारवाई करणार का असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी उपस्थित केला आहे.









