पश्चिम बंगाल मंत्र्याच्या वादग्रस्त विधानामुळे संताप
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे वातावरण तापलेले असताना याच राज्याच्या एका मंत्र्याने महिलांसंबंधी वादग्रस्त विधान केल्याने लोकांच्या संतापात भर पडली आहे. या विधानाचा संबंध या बलात्कार आणि हत्या प्रकरणाशी असल्याने या मंत्र्याचा सर्वत्र निषेध होत आहे. कोलकाता येथील आर. जी. कार महाविद्यालयात एका महिला डॉक्टरची निर्घृण बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ बुधवारी मध्यरात्री या राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील महिला निषेध मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे नाव ‘मध्यरात्र स्वातंत्र्य मोर्चा’ असे ठेवण्यात आले आहे. आज गुरुवारी भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. परंतु महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. विशेषत: पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेची स्थिती भयावह आहे. याच्या निषेधार्थ हे राज्यव्यापी मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. याच मोर्च्यांच्या संदर्भात राज्याचे एक मंत्री उदयन गुहा यांनी या मोर्चात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांना उद्देशून ‘तुम्हाला तुमच्या नवऱ्यांनी मारहाण केली तर मला फोन करु नका’ असे अवमानजनक विधान बुधवारी केले. असंख्य महिलांनी सोशल मिडियावर या विधानासंबंधी संतापाची भावना व्यक्त केली आहे.
आंदोलन सुरुच
महिला डॉक्टरवर बलात्कार आणि नंतर तिची हत्या या घटनेविरोधात गेले दोन दिवस सुरु असलेले उग्र आंदोलन अद्यापही होत आहे. पिडीतेला न्याय मिळेपर्यंत ते होत राहील असे राज्यातील वैद्यकीय विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट केले आहे. आता या आंदोलनाला पश्चिम बंगालमधील अनेक इतर क्षेत्रातील लोकांचा आणि संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आंदोलनाची धार वाढली आहे.
राहुल गांधींची प्रतिक्रिया
ही क्रूर घटना घडल्यानंतर पाच दिवसांच्या नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी राज्यसरकारच्या ढिलाईसंबंधी काहीही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी या हत्येतील आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो निषेधार्ह असल्याचा संदेश ‘एक्स’ वरुन व्यक्त केला. पिडितेला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.









