भाजपकडून टीकेचा भडिमार : भारत जोडो नव्हे तर आग लगाओ यात्रा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. या यात्रेदरम्यान काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी प्रदर्शित केलेल्या एका पोस्टरमुळे मोठा वाद उभा ठाकला आहे. काँग्रेसने स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकौंटवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचा एक फोटो शेअर केला आहे. या गणवेशातील हाफ पँटला आग लागल्याचे दाखविण्यात आले आहे.
देशाला द्वेषाच्या वातावरणापासून मुक्त करणे आणि संघ-भाजपकडून करण्यात आलेल्या नुकसानाची भरपाई पूर्ण करण्यासाठी आम्ही पावले टाकत आहोत असे काँग्रेसने स्वतःच्या ट्विटमध्ये नमूद पेले आहे.
काँग्रेसच्या या ट्विटवर वाद सुरू झाला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. काँग्रेसने हा ट्विट त्वरित डिलिट करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी आणि त्यांचे पूर्ण कुटुंब तसेच काँग्रेसला ‘आगी’बद्दल एवढे प्रेम का अशी उपरोधिक टिप्पणी पात्रा यांनी केली आहे.
शिखविरोधी 1984 च्या दंगलीदरम्यान पंजाब पेटले होते. शिखांची कत्तल करण्यात आली होती. राहुल गांधी हे पोस्टर ट्विट करून देशात हिंसा इच्छित आहेत का? संघ अन् भाजपच्या विचारसरणीला मानणाऱया लोकांना पेटवून देण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे का असे म्हणत पात्रा यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. हे भारत जोडो नव्हे तर भारत तोडो, आग लगाओ आंदोलन आहे. भारतीय राज्यघटनेत हिंसेला कुठलेच स्थान नसल्याची भाजपची भूमिका असल्याचे पात्रा म्हणाले.
राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु राजकीय विरोधकांना पेटवून देऊ पाहणाऱया मानसिकतेची गरज काय? नकारात्मकता आणि द्वेषाच्या या राजकारणाची सर्वांनी निंदा करावी असे उद्गार उत्तरप्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांनी ट्विट करत काढले आहेत.
1984 मध्ये काँग्रेसने दिल्लीला पेटवून दिले. त्यानंतर 2002 मध्ये गोध्रा येथे 59 कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. काँग्रेसने आता पुन्हा हिंसेचे आवाहन केले आहे. काँग्रेस आता राजकीय पक्ष राहिलेला नाही. राहुल गांधी हे केवळ भारताच्या विरोधात लढत असल्याची टीका भाजयुमो अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली आहे.









