हॉटेलच्या छतावरून झाली होती दगडफेक : आम आदमी पक्षाच्या नेत्यावर हत्येचा आरोप
वृत्तसंस्था/ नूंह
हरियाणाच्या नूंहमध्ये हिंसेदरम्यान सहारा नावाच्या हॉटेलच्या छतावरून दगडफेक करण्यात आली होती. प्रशासनाने हे हॉटेल आता जमीनदोस्त करविले आहे. रविवारी कडेकोट बंदोबस्तात या हॉटेलवर बुलडोझर चालवून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी नूंहमध्ये अवैध बांधकामे हटविण्यात आली. ही अवैध बांधकामे 31 जुलै रोजीच्या हिंसेत सामील समाजकंटकांची असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नूंह येथील हिंसेदरम्यान गुरुग्राम येथील प्रदीप शर्माचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेत नेते जावेद अहमद समवेत 150 जणांवर हत्येचा एफआयआर नोंदविला आहे. 31 जुलै रोजी कारने जात असलेल्या लोकांवर जमावाने हल्ला केला होता. या जमावात जावेद अहमदचा समावेश होता. जावेदच्या सांगण्यावरूनच जमावाने कारमधील लोकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रदीपचा मृत्यू झाला होता असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.
काँग्रेस आमदाराची सुरक्षा हटविली
राज्य सरकारने काँग्रेस आमदार मामन खान यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. मामन खान हे नूंहच्या फिरोजपूर झिरका मतदारसंघाचे आमदार आहेत. नूंह हिंसेत खान यांचा सहभाग होता, असा आरोप आहे. मामन खान यांचा धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
2 जिल्ह्यांमधील इंटरनेट बंदी मागे
राज्य सरकारने फरिदाबाद आणि गुरुग्रामच्या पटोदी तसेच मानेसर आणि सोहना भागातील इंटरनेट बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु नूंहमध्ये 8 ऑगस्ट तर पलवलमध्ये 7 ऑगस्टपर्यंत इंटरनेटवर बंदी असणार आहे. नूंहमध्ये संचारबंदीदरम्यान जिल्ह्यात 22 न्यायदंडाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. संबंधित भागांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. लोकांचे सहकार्य मिळावे म्हणून त्यांचे संपर्क क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारच्या स्थितीला हाताळण्यासाठी या न्यायदंडाधिकाऱ्यांना त्वरित निर्णय घेता येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाला नूंहमधील समाजकंटकांवर मोठ्या कारवाईचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.









