अध्याय एकोणतिसावा
अठ्ठावीसाव्या अध्यायात भगवंतांनी ब्रह्माचे परिपूर्ण वर्णन केले. त्याचे परम श्रद्धेने सेवन केल्यामुळे उद्धवाला पूर्ण समाधान लाभले. उद्धव स्वत: तृप्त झाला आणि त्याने विचार केला की, हे आत्मज्ञान सर्वसामान्य कुवतीच्या लोकांना मिळालं पाहिजे परंतु ह्यात अडचण अशी की, ब्रह्मस्थिती समजायला कठीण आहे. ती सर्वांना समजण्यासाठी देवंच काहीतरी चांगला उपाय सांगतील असा विचार करून त्याने भगवंतांना लगेचच त्याबद्दल विनंती करायचे ठरवले.
भगवंत निजधामाला गेल्यावर साधकांच्या हाताला ब्रह्मप्राप्ती लागणार नाही हे लक्षात घेऊन साधकांच्या हितासाठी उद्धवाला त्यांचा कळवळा दाटून आला. त्यातूनच तो आता भगवंतांना म्हणाला, ज्याप्रमाणे जिना उतरून मनुष्य सहजी वरच्या मजल्यावरून खाली उतरतो त्याप्रमाणे अज्ञ जनांना संसार सागर तरुन जाण्याच्या दृष्टीने ब्रह्मप्राप्ती कशी करून घ्यावी ह्याचे अगदी सोपे साधन कृपया सांगा. हे कृष्णा, कमलनयना साधक साधना करताना त्रासणार नाही असा उपाय सांगा. साधकांची योगसाधना करावी अशी इच्छा असते परंतु त्याच्या साधनेमध्ये अनेक अडचणी उभ्या राहतात. त्यामुळे तो नाउमेद होतो. उदाहरणार्थ मनाचा निग्रह साधण्यासाठी साधक प्राणायाम करावा असे ठरवतो परंतु त्याचे मन क्षणभरसुद्धा स्थिर राहू शकत नाही.
एकांतात आसन घालून मनाचा निग्रह करून मनाला एकाग्र करावे असे त्याला वाटत असते पण त्याचे मन त्याला ठकवून केव्हाच दुसरीकडे निघून जाते. मनोनिग्रह करायचा म्हणून कुणी स्वत:ला कोंडून घेतात परंतु त्याचा काहीही उपयोग न होता, त्याचे मन अत्यंत चपळतेने तेथून निघून जाते. कुणी अन्नपाण्याचा त्याग करून मनाला काबूत आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्याही पदरी निराशाच येते. जो जो मनाचा निग्रह करायला जावे तो तो ते अधिकाधिकच खवळून उठते. मोठमोठे सज्ञान लोकही मनाला बांधून ठेवायला अकार्यक्षम ठरतात मग सामान्य साधक मनोनिग्रह करताना थकून गेला तर त्यात आश्चर्य काय? एकवेळ वाऱ्याला बांधून ठेवता येईल, अग्नीला शांत करता येईल, समुद्र पिऊन टाकता येईल पण मनाला आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र करता येणे कठीण आहे. मनाचा निग्रह करणे किती कठीण आहे हे भगवंताना उलगडून सांगताना आधी सांगितलेल्या गोष्टी पुरेशा होणार नाहीत असे वाटून उद्धव पुढे म्हणाला, एकवेळ आकाशाची चौघडी करता येईल, महामेरुची पुडी बांधता येईल परंतु मनाच्या ओढीना बांध घालणे अशक्य आहे. कदाचित काळाला जिंकता येईल, त्रिभुवनाची सत्ता मिळवता येईल पण मनोनिग्रहाची वार्ता, अच्युता तुझ्या कृपेशिवाय शक्य होणारी नाही. मी मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना मन क्षणात छळून काढते. नेमस्त म्हणजे अगदी नियमानुसार वर्तणूक करणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवून मन त्यांच्या नेमस्तपणाच्या चिंध्या उडवते. मनाची ताकद अफाट असते. भल्याभल्यांच्या ताकदीपेक्षा त्याची ताकद जास्त असते. मन इंद्राला मान खाली घालायला लावते, ब्रह्मदेवालासुद्धा वाकवायची ताकद मनात आहे. मन कुणाच्याही धैर्याची राखरांगोळी करायला समर्थ असते. जेव्हढा समोरचा मनुष्य आव्हानात्मक वागतो तेव्हढ्याच ताकदीने मन त्याचा बिमोड करते. मनाला त्याच्यासमोर मी किती धैर्यवान आहे अशी प्रौढी मिरवलेली अजिबात आवडत नाही. सांगायचं तात्पर्य असं की अच्युता साधनी शिणूनसुद्धा मनोविजय हाती न आलेल्या साधकाला तू कृपा केल्याशिवाय मनोविजय हाती येत नाही. हे लक्षात आल्यावर तुला संपूर्ण शरण जाऊन साधकाने मनोजय साधला रे साधला की, सिद्धी त्यांची वाट अडवून उभ्याच असतात. असे झाले की, मन साधकाला सिद्धीच्या मोहात अडकवून टाकते. शेवटी साधकांना केवळ तुझाच आधार असतो. त्या आधाराने ते तुला प्रसन्न करून घेतात तू प्रसन्न झाल्यावर मात्र तुझ्या कृपेपुढे मनाचे काही एक चालत नाही.
क्रमश:








