मुख्याध्यापिका रोशन पैंगीणकर यांचे मत, म्हाऊस पंचायत-दाबे माध्यमिक विद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह
वाळपई : रस्त्यावर घडणाऱ्या अपघातावर नियंत्रण राखायचे असेल तर प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी यासाठी मुलांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करावा. अपघातामुळे आज अनेकांचे जीव जावू लागलेले आहेत. हे अपघात रोखायचे असेल तर प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. समाजसेवी संस्थांनी या संदर्भात पुढाकार घेऊन समाजातील प्रत्येक घटकाला सावध करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन दाबे सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोशन पैगीणकर यांनी केले. म्हाऊस ग्रामपंचायत व दाबे सरकारी माध्यमिक विद्यालय यांच्यावतीने सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विद्यालयाच्या मुलांनी दाबे गावामध्ये जनजागृतीची रॅली काढून नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून वाहने कशाप्रकारे चालवावी, वाहने चालविण्याबाबत मार्गदर्शन व मार्गदर्शक तत्वे यासंदर्भाची जनजागृती करण्यात येते, असे पैगीणकर यांनी सांगितले.
यावेळी वाहतूक खात्याचे अधिकारी नामदेव गावस व किशोर आमोणकर, याप्रसंगी पंच सदस्य गुऊदास गावस, सयाजी सावंत, शिक्षिका गावकर व इतरांची उपस्थिती होती. आज रस्त्यावर वाहन परवाने नसताना गाड्या चालविण्यात येतात. अशातून मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात. सरकार आपल्यापरीने अपघात रोखण्याचे काम करीत आहे. मात्र समाजाचा पाठिंबा लाभत नाही तोपर्यंत अपघातांवर नियंत्रण येणे शक्य नसल्याचे किशोर आमोणकर यांनी सांगितले. विद्यालयाचे शिक्षिका स्वाती गावकर यांनी रहदारी संदर्भात विस्तृत माहिती दिली. नामदेव गावस यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत सचिव संदीप हल्ल्याळी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व दाबे सरकारी माध्यमिक विद्यालयाचे इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले.









