जिल्ह्यात 16 हजारांहून अधिक गट : बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावणार : कर्जपुरवठ्यासह प्रशिक्षणही सुरू
बेळगाव : बचत गटांत आतापर्यंत दारिद्र्यारेषेखालील गटांना प्राधान्य देण्यात येत होते. त्यामुळे काही गटांचाच आर्थिक स्तर उंचावत होता. याचा विचार करून केंद्र सरकारने प्रत्येक गटातील आर्थिक स्तर उंचावण्यासाठी इंटेन्सिव्हमध्ये समावेश करून त्यांच्या कामांना चालना देण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16 हजार 989 बचत गटांचा समावेश असून याची वॉर्डनिहाय रचना करण्यात आली आहे. अजूनही यामध्ये सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, धर्मस्थळ गटांचेही किंवा तेथील सदस्य संख्या सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक वॉर्डाला 5 लाख ऊपयांचा निधी देऊन बचत गटातील महिलांना उद्योग व व्यवसाय थाटून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक बचत गटातील महिलांना रोजगार मिळणार आहे. याचबरोबर कर्ज पुरवठाही करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत देशातील विभागांना इंटेन्सिव्ह व नॉन इंटेन्सिव्ह अशा दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. बचत गट चळवळीने महिलांना आर्थिक बळ दिले खरे, पण आतापर्यंत केवळ दारिद्र्यारेषेखालील गटांनाच प्राधान्य दिले जात होते. आता बेळगाव जिल्ह्याचा समावेश इंटेन्सिव्हमध्ये करण्यात आल्याने सर्व बचत गटांतील महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार असून त्यांच्या सबलीकरणासाठी सरकारने चांगला मार्ग निवडल्याचे दिसून येत आहे. बँकांकडून शून्य व्याजदराने, विना तारण, विना कारण पाच लाखांहून अधिक ऊपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. दहा लाखांपर्यंत एका ग्राम पंचायतीला कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून बचत गटांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे आता गावागावात महिलांचे सबलीकरण करण्यास मदत होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात बचत गटांची माहिती विभागवार घेण्यात आली असून एका विभागात सुमारे पाच बचत गट घेण्यात आले आहेत. त्यामुळे एका ग्राम पंचायतीमध्ये पाचहून अधिक बचत गट असल्यास दुसऱ्या विभागात त्यांची वर्णी लावून त्यांना या योजनेचा फायदा करून देण्यास मदत करण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुक्मयात कर्मचारी वाढणार
बेळगाव जिल्ह्याचा समावेश इंटेन्सिव्हमध्ये करण्यात आल्याने आता जिल्हा पंचायत कार्यक्षेत्राबरोबरच तालुक्मयातील कर्मचाऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. महिलांना कर्ज वितरण करणे, उद्योग सुरळीत चालतो की नाही याची पाहणी करणे याचबरोबर इतर कामेही लागणार आहेत. कर्ज वितरणाबरोबरच सर्वच कामांच्या उद्दिष्टात काही पटींनी वाढ होणार आहे. त्यामुळे किमान 10 ते 15 जणांना नोकरी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
धर्मस्थळ गटांतील सदस्यांनाही करणार सामील
इंटेन्सिव्हमध्ये बेळगावबरोबरच संपूर्ण राज्यात मोठे यश मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 1 हजार 941 सदस्य झाले असून, 16 हजार गटांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारनेही नुकताच धर्मस्थळमधील सदस्यांनाही यामध्ये सामील होण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता या सदस्य संख्येत पुन्हा वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय इंटेन्सिव्ह गटातील सदस्यसंख्या व गट
- तालुका गट सदस्य
- अथणी 1352 13410
- बैलहोंगल 1492 19820
- बेळगाव 2032 22386
- चिकोडी 2170 27762
- गोकाक 900 10118
- हुक्केरी 1669 19802
- कागवाड 425 4599
- खानापूर 1292 17083
- कित्तूर 465 5499
- मुडलगी 557 6589
- निपाणी 938 12657
- रामदुर्ग 1071 12638
- रायबाग 1190 12620
- सौंदत्ती 1436 16958
- एकूण 16989 201941









