राज्यपाल थावरचंद गेहलोत : व्हीटीयूचा 24 वा दीक्षांत सोहळा : 500 हून अधिक विद्यार्थी सन्मानित
प्रतिनिधी / बेळगाव
देशात स्त्री सबलीकरणावर मोठे काम सुरू आहे. स्त्रियांचा शिक्षणाकडील ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या पदवीदान समारंभात महिलांची संख्या अधिक असल्याने स्त्री शिक्षणाचा हेतू साध्य होत आहे. आमच्या देशाची प्रगती ही महिलांचे योगदान आणि सक्षमीकरणावर अवलंबून असल्याचे मत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केले.
विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) चा 24 वा दीक्षांत सोहळा शनिवारी पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी पदव्युत्तर अणि डॉक्टरेट मिळविलेल्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. व्यासपीठावर तामिळनाडू येथील एनआयसीएचई युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. टेसी थॉमस, कुलगुरु प्रा. विद्याशंकर एस., सदाशिव गौडा, रजिस्ट्रार बी. ई. रंगास्वामी व टी. एन. श्रीनिवास उपस्थित होते.
डॉ. टेसी थॉमस यांनी महिलांच्या प्रगतीविषयी माहिती दिली. भारताच्या अंतराळ आणि संरक्षण विभागातील प्रगतीबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात अनेक नवीन बदल होत असून जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी हे बदल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात एमटेक, एमप्लॅन, एमआर्च, एमबीए, एमसीए या विषयांतील 20 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. या बरोबरच 500 हून अधिक विद्यार्थ्यांना पीएचडी तसेच इतर पदव्यांनी सन्मानित करण्यात आले.









