संचालक नितीन भोसले यांची अभिमानास्पद कामगिरी
बेळगाव : बेळगाव ही अनेक गुणवंत आणि यशवंत व्यक्तींची खाण आहे. साहित्य, संगीत, कला, वैद्यकीय, वैज्ञानिक यासह अनेक क्षेत्रांमध्ये बेळगावच्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. चांद्रयान-3 मोहिमेमध्ये बेळगावचे योगदान वैशिष्ट्यापूर्ण असेच असून बेळगावचेच उद्योजक ‘फ्लेक्सपर्ट बेलोज प्रा. लि.’चे संचालक नितीन भोसले यांचेही योगदान चांद्रयान मोहिमेमध्ये उल्लेखनीय असेच ठरले आहे. फ्लेक्सपर्ट बेलोज कंपनीने पूर्णपणे डिझाईन करून विकसित केलेले ‘एक्स्पान्शन बेलोज’ हे दोन मीटर व्यासाचे महत्त्वाचे उपकरण इस्रोच्या चांद्रयान प्रकल्पामध्ये ‘ट्रायसोनिक विंड ब्लोडाऊन टनेल’मध्ये वापरण्यात आले आहे. विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे या उपकरणातील सर्व घटक हे पूर्णत: भारतीय बनावटीचे असून अत्यंत दर्जेदार गुणवत्ता आणि काटेकोर निकषांमधून पुढे आले आहेत. फ्लेक्सपर्ट बेलोज ही कंपनी गेल्या 20 वर्षांपासून वेगवेगळ्या अभियांत्रिकी प्रकल्पांसाठी जगातील 40 हून अधिक देशांमध्ये आपल्या उपकरणांची निर्यात करते. परिपूर्ण गुणवत्ता, स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि तत्पर सेवा यामुळे कंपनीने जागतिक बाजारपेठेमध्ये चांगला जम बसविला आहे. याशिवाय देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. इस्रोशी केलेल्या करारामुळे चांद्रयान मोहीम प्रत्यक्षात उतरेपर्यंत गुप्तता पाळणे हे व्यावसायिक नितीमत्तेला धरून होते. त्यामुळे नितीन भोसले यांनी याबाबत फारशी वाच्यता केली नाही. आता चांद्रयान मोहीम प्रत्यक्षात आल्याने बेळगावच्या या कंपनीचा यामधील सहभाग बेळगावकरांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
उत्पादन दुपटीचा कंपनीचा मनोदय
फ्लेक्सपर्ट बेलोज ही कंपनी फ्लेक्झिबल पाईपिंग सिस्टीमसाठी सोल्युशन पुरविणारी मोठी कंपनी आहे. अवकाश संशोधन, अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या उत्पादनांचे डिझाईन तयार करून ते उत्पादन पुरविणे हे कंपनीचे वैशिष्ट्या आहे. येत्या 2026 पर्यंत कंपनीला आपले उत्पादन दुपटीने वाढवायचे आहे, असा मनोदय नितीन भोसले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.









