साताऱ्यात आचारसंहिता लागू होताच बॅनर झाकण्याची लगबग
सातारा : नगरपालिकेचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू होताच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इच्छुकांनी लावलेले बॅनर झाकण्याची लगबग सुरु होती. सातारा शहरातील बहुतांशी सर्वच कार्यालयात आपली बिले काढण्यासाठी तसेच प्रस्तावावर मंजूरी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये तसेच शासकीय कार्यालयात गर्दी दिसत होती.
सातारा नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर होत आहे. २०१६ मध्ये २७ नोव्हेंबरला मतदान होवून २८ नोव्हेंबर २०१६ रोजी मतमोजणीची प्रक्रिया झाली होती. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ही तारीख जाहीर होणार असल्याने शहरातील बांधकाम भवन, जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, कृषी विभाग आदी कार्यालयात ठेकेदार, नागरिक यांनी सकाळपासून गर्दी केली होती.
त्यात दुपारी ४ वाजेपर्यंत साहेबांची सही बिलावर कशी होईल, यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळत होते. अधिकारी सुद्धा मंगळवारी सकाळपासूनच आपल्या केबीनमध्ये फायलींचा ढिगारा तपासण्यात मग्न असल्याचे पहायला मिळत होते. अनेक अधिकाऱ्यांनी चक्क दुपारचे जेवणही आपल्याच केबिनमध्ये कसेबसे उरकले अन् बिलावर व नव्या कामांच्या प्रस्तावावरसह्या केल्या. प्रत्येक कार्यालयात अशीच तारांबळ दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु होती. दरम्यान, चार वाजता आचारसंहिता लागल्यानंतर सातारा नगरपालिकेच्या निवडणूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शहरातील इच्छुकांचे लागलेले बॅनर झाकण्याचे व काढून घेण्याची मोहीम सुरु केली.
निवडणूक प्रचारासाठी अल्पवेळ
एकदाची आचारसंहिता जाहीर झाली असून प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ आहे. त्यामुळे सातारा शहरात २५ प्रभागातून ५० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्याकरता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी महायुती तर राष्ट्रवादी (श.प.), उबाठा आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता असून दोन्ही पॅनेलकडून इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अल्पवेळ मिळत असल्याने त्याचेही नियोजन त्यांच्याकडून सुरु आहे.








