स्वत:च उचलताहेत टेंडर, दुसऱ्याच्या परवान्याचा वापर
बेळगाव : एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य असताना कोणत्याही सरकारी योजनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ सदस्य व त्याच्या कुटुंबीयांना घेता येत नाही, असा आदेश सरकारला आहे. मात्र, बेळगावात या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याची घटना ताजी असतानाच महानगरपालिकेतील काही नगरसेवक स्वत: ठेकेदार म्हणून मनपाची कामे करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नगरसेवकवजा ठेकेदारांची संख्या अधिक असल्याचेही बोलले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने गोवावेस येथे उभारण्यात आलेल्या खाऊ कट्ट्यातील दोन गाळे नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांनी घेतले होते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली होती. या खटल्याचा निकाल देताना प्रादेशिक आयुक्तांनी महानगरपालिकेचा अप्रत्यक्षरीत्या लाभ घेतल्याचा ठपका ठेवत वरील दोघा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
मनपाच्या लिलाव प्रक्रियेत नगरसेवक नसताना त्यांनी आपल्या पत्नींच्या नावे गाळे घेतले असले तरी ते निवडून आल्यानंतर सदर गाळे मनपाला हस्तांतरित करणे गरजेच होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रादेशिक आयुक्तांनी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बेळगावातील राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर आता काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या दुकानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इतकेच नव्हे तर महापालिकेतील काही नगरसेवक स्वत: मनपाचे ठेकेदार म्हणून काम करत असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या ठेकेदारांना काम न देता स्वत:च आपल्या प्रभागातील कामे काही नगरसेवक करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुसऱ्या ठेकेदाराच्या परवान्यावर कामे मिळवून नगरसेवक ठेकेदाराची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे नगरसेवकवजा ठेकेदारावर कोणती कारवाई होणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.









