केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरींकडे पोहोचल्या तक्रारी : गडकरी उद्या गोव्यात, सगळ्याचे लक्ष गडकरींच्या भूमिकेकडे
पणजी : पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार दिवसांत वारंवार कोसळत राहिलेल्या दरडीमुळे कंत्राटदार, सल्लागार आणि संबंधित अभियंते वादाच्या गराड्यात सापडले असून उद्या गुऊवारी केंद्रीय महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे गोव्यात येत असल्याने या दरडी हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र ते गोव्यात येण्यापूर्वीच अनेकांनी मंत्री गडकरी यांच्याकडे संबंधित कंत्राटदाराविरोधात तक्रारी केल्या आहेत. गिरी ते पत्रादेवी दरम्यानच्या महामार्गाचे काम राव नामक ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्या कंत्राटदाराने बांधकाम बरोबर केलेले नाही. त्याच्याविरोधात अनेकांच्या गंभीर तक्रारी आहेत.
फ्लायओव्हरवर उडतात वाहने
गिरीवऊन पुढे फ्लायओव्हरवर गाडी घेतल्याबरोबर ती उडायलाच लागते. रोड इंजिनियरिंगचा अभाव वाटतो. संपूर्ण रस्त्याचे बांधकामच सदोष पद्धतीचे वाटते. एवढेच नव्हे, तर याच कंत्राटदाराने पत्रादेवीपर्यंतचे बांधकाम केलेले आहे आणि वाटेल तसे डोंगर कापलेले आहेत. त्यातील माती सखल भागात टाकून रस्त्याची उंची वाढविली आहे.
डोंगर कापण्याची पद्धत चुकीची
डोंगर कापल्यानंतर त्याला ज्या पायऱ्या कराव्या लागतात, त्या मुळीच केलेल्या नाहीत. 10 ते 15 मीटर उंच अशा पद्धतीने डोंगर सपाट कापलेला आहे. पावसाळ्dयात या डोंगराचे पाणी सपाट भागापर्यंत म्हणजेच कापलेल्या भागापर्यंत पोहोचते. लालमाती भुसभुशीत प्रकाराची आहे. मातीत मिसळलेल्या पाण्यामुळे वजन पेलणे डोंगराला शक्य झाले नाही आणि डोंगराच्या कडांना आधार मिळत नसल्याने दरडी कोसळल्या.
संरक्षक भिंतीचे बांधकामही चुकीचे
दरडी कोसळू नयेत म्हणून ज्या संरक्षक भिंती उभारल्या आहेत, त्यांचे बांधकामही ज्या पद्धतीने झाले पाहिजे तसे ते झालेले नाही. ही बांधकामे देखील उभी व सरळ झाली आहेत. सारे वजन एकाच पातळीवर आले आणि त्यामुळेच संरक्षक भिंत देखील कोसळली. आता या साऱ्या प्रकारास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आतापर्यंत पाच वेळा कोसळल्या दरडी
गेल्या चार दिवसांमध्ये दरडी कोसळण्याचे पाच प्रकार केवळ या महामार्गावरच घडले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या बराचसा महामार्ग बंद ठेवलेला असला तरी देखील धोका काही टळलेला नाही. बांधकाम करण्याची पद्धत आणि अभियंत्यांचे विक्षिप्त डोके. या सर्वांवर कडी म्हणजे बांधकामाचा सुमार दर्जा. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूकच बंद पाडण्याची नामुष्की सरकारवर आलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्या गोव्यात येत असून ते या संदर्भात संबंधित कंत्राटदार वा अभियंत्यांना कोणते बोल सुनावतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सरकारच्या मर्जीतील हा ‘राव’ कोण?
कंत्राटदार ‘राव’ हा सरकारच्या मर्जीतील आहे. त्याने पणजी ते ‘फुलांचो खुरीस’ बांबोळीपर्यंत जे महामार्गाचे बांधकाम केलेय ते सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळेच या मार्गावऊन जाणाऱ्या वाहनांना वारंवार हादरे बसतात. सांताक्रूझ येथे तर फ्लायओव्हरलाच उभी फूट पडलेली आहे. रस्त्याला तडे गेलेले आहेच, शिवाय पुलाला पडलेली भेग व गेलेले तडे गंभीर प्रकारचे आहे. आतापर्यंत तीन वेळा त्याची दुऊस्ती करण्यात आली. सध्या नव्याने पडलेली भेग बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असून कंत्राटदाराला हे सरकार खडसावून विचारत नाही. हा राव नेमका कोण? त्याला पाठीशी घालण्यामागील कारण काय? असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत.