अकरा महिन्यांपासून वेतन थकले : न्याय देण्याची मागणी
बेळगाव : रायबाग तालुका रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या डी वर्ग कर्मचाऱ्यांचे अकरा महिन्यांपासूनचे वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आपण आर्थिक संकटात सापडलो असून त्वरित वेतन देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन कामगार हितरक्षण सेवा संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगाव येथील राम कॉम्प्युटर यांच्यामार्फत आपण 15 जण डी वर्ग कर्मचारी रायबाग तालुका रुग्णालयात सेवा बजावत आहोत. अकरा महिन्यांपासून वेतन देण्यात आले नसल्याने रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. मात्र सदर अधिकाऱ्यांनी कंत्राटी संस्थेकडे बोट दाखविले आहे. कंत्राटदार संस्थेकडे चौकशी केली असता रुग्णालयाकडून बिल आले नसल्याने वेतन देण्यास विलंब झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मुख्य वैद्याधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आणखी काही दिवस थांबण्यासाठी सांगण्यात येत आहे. अशा प्रकारामुळे आपण आर्थिक अडचणीत आलो आहोत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, वेतन थकविण्यात आलेल्या कंत्राटी कंपनीला सूचना करून त्वरित वेतन देण्यासाठी भाग पाडावे, अशा मागणीचे निवेदन कामगार हितरक्षण सेवा संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी राजू कांबळे, शिवराम कांबळे, अनिल कांबळे, संजू साने, बसू हिरेकुडी आदी उपस्थित होते.









