वार्ताहर /कडोली
कडोली, जाफरवाडी, केदनूर, बंबरगा भागात संततधार पावसाने हजेरी लावल्याने भात रोप लागवडीच्या कामांना वेग आला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कडोली परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने भात रोप लागवडीसाठी शेतकऱयांनी उपयुक्त हंगाम साधला आहे.
सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, पण कडोली परिसरात मध्यम स्वरुपाच्या संततधार पावसाने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. आता भात रोप लागवडीच्या कामांना वेग आल्याने मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. ट्रिलरच्या साहाय्याने चिखल करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे.
कडोली, जाफरवाडी, केदनूर, गुंजेनहट्टी, देवगिरी, बंबरगा भागात भात रोप लागवडीची कामे जोरात सुरू आहेत. कडोली परिसरात विशेषकरून इंद्रायणी भाताची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असते. मात्र, वाढलेल्या खतांच्या दराने शेतकरीवर्गात नाराजी आहे. शिवाय कामगारांची मजुरीही 200 ते 250 रुपयेपर्यंत झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.









