कोबीसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान : शेतकरी आर्थिक संकटात
वार्ताहर/कडोली
गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने कडोली परिसरात अंतिम टप्प्यात आलेल्या उन्हाळी कोबीसह भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. मशागतीच्या कामाबरोबर भात रोप लागवडीसाठी होणारी पेरणीची कामेही रखडली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कडोली परिसरात पावसाने कहरच केला आहे. ढगफुटीसदृश पावसाने तर एका दिवसांत पाणीच पाणी करून टाकले. त्यानंतर दररोज पावसाची हजेरी होत आहे. आता तर गेले चार पाच दिवस झाले पावसाची संततधार सुरू आहे. अंतिम टप्प्यातील उन्हाळी पिके नुकसानीत आली आहेत. पाणी अधिक झाल्याने कोबीसह सर्व भाजीपाला कुजून गेला आहे. तर याउलट सतत पडत असलेल्या पावसाने खरीप पिकांच्या पेरणीसाठी खरीपपूर्व कामांनाही ब्रेक लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मशागतीच्या कामांना जोर येत होता. हंगामाप्रमाणे सर्व कामे पूर्ण केली जात होती. पण यावर्षी साततच्या पावसाने शेती व्यवसायातील सर्व कामे रखडली आहेत.
भात पेरणीसाठी योग्य हंगामाची साथ मिळत नसल्याने अडचण
शिवाय भातरोप लागवडीसाठी भात बियाणांची पेरणी करणे आवश्यक आहे. पण यासाठी योग्य हंगाम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आता सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाला जोडून मान्सून पावसाला सुरू होणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास मान्सून पाऊस किती प्रमाणात उघडीप देणार यावरच शेती व्यवसाय अवलंबून राहणार आहे.मात्र या सततच्या पावसाने कडोली परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच परिसरातील नाल्यांनाही पाणी आल्याने सध्या जणू पावसाळाच सुरू झाल्याचे भासत आहे.









