कोल्हापूर :
भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची मीमांसा, चिकित्सा केली पाहिजे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात उमटला.
शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत ‘मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा‘ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादामध्ये रवींद्र इंगळे–चावरेकर (बुलडाणा) यांनी बीजमांडणी केली. डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) आणि डॉ. गोमटेश्वर पाटील (कोल्हापूर) यांनी परिसंवादात सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते.
रवींद्र इंगळे–चावरेकर म्हणाले, उपलब्ध साहित्यावरुन भाषेचे प्राचीनत्व आणि अभिजनत्व यांची निश्चिती केली जाते. मराठी भाषेमध्ये सन 1129मध्ये ‘मानसोल्हास‘, त्यानंतर बाराव्या शतकात विवेकसिंधु, लीळाचरित्रापासून ते पुढे ज्ञानेश्वरीपर्यंत असे नऊ ग्रंथ सापडतात. या ग्रंथांतील मराठीचे भाषावैभव उच्च दर्जाचे आहे. भाषा जन्मली आणि लगेच त्या भाषेमध्ये समृद्ध वाङ्मय निर्माण झाले, असे होत नाही. मराठीतील या उपलब्ध साहित्यामध्येही ग्रंथभाषा आणि लोकव्यवहार भाषा असा फरक दिसतो.
‘मराठी भाषा: बहुविध इतिहासाची दृष्टी‘ या विषयावर डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, ब्रिटीश काळात मराठीविषयी भाषाशुद्धीच्या अनुषंगाने चांगले विचार मांडण्यात आले. भांडारकर, चिपळूणकर, तर्खडकर, दामले इत्यादी व्याकरणकारांवर तौलनिक भाषाविज्ञानाचा मोठा प्रभाव दिसतो. जर्मन आणि ब्रिटीश अभ्यासकांनी संस्कृत आणि इतर भाषांचा सहसंबंध जोडून घेतला. भाषांमध्ये हा आंतरिक व्यवहारही समृद्धतेच्या दिशेने घेऊन जातो.
‘मराठीच्या पूर्वेतिहासाचा शोध‘ या विषयावर गोमटेश्वर पाटील म्हणाले, महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेतून मराठी भाषेचा पूर्वेतिहास आपल्याला शोधता येतो. महाराष्ट्रीय प्राकृत आणि महाराष्ट्रीय अपभ्रंश यांचा सहसंबंधही जोडता येतो. महाराष्ट्रीय मध्ययुगीन कवींच्या साहित्यातूनही मराठीच्या पूर्वेतिहासाचा शोध घेता येतो. शिलालेख, ताम्रपट, गद्यलेखन यांमधून मराठीची वेगवेगळी रुपे सापडतात.
डॉ. महादेव देशमुख म्हणाले, व्यवहारात भाषेची अनेक रुपे प्रचलित असतात, तिची रुपांतरणेही होत असतात. भाषा आणि बोलीभाषा तसेच भाषा आणि लिपी यांच्यातही फरक असतो. या रुपांतरणाचा आणि फरकांचा अभ्यास व्हायला हवा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठात होत असलेल्या या परिसंवादाचे दस्तावेजीकरण व्हायला हवे.
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य जी. पी. माळी, डॉ. अनिल गवळी, डॉ. मेघा पानसरे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अरुण शिंदे आदी उपस्थित होते.








