जयाजी मोहिते यांचे मार्गदर्शन : स्वराज्य घडविण्याचे इंदुलकरांचे आवाहन
बेळगाव : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गामाता दौडचे यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. बेळगावमध्ये काढण्यात येत असलेली दौड धर्मसंस्कारांचे केंद्र ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची ओळख आजच्या तरुणपिढीला दुर्गामाता दौडच्या माध्यमातून होत आहे. सोमवारी बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आलेल्या दौडचे गल्लोगल्ली जल्लोषी स्वागत करण्यात आले. बालचमूंनी सादर केलेले देखावे व ऐतिहासिक वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. नवव्या दिवशीच्या दौडला ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरापासून प्रारंभ झाला. हिंदवी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख व शिवरायांचे विश्वासू मावळे हिरोजी इंदुलकर यांचे तेरावे वंशज संतोष इंदुलकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तेरावे वंशज जयाजी मोहिते व उद्योजक प्रकाश चौगुले यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणा मंत्र होऊन दौडला प्रारंभ झाला.
पहाटेच्या धुक्यातून दौड फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली या प्रमुख गल्ल्यांमधून पुढे सरकत होती. भल्या मोठ्या स्वागत कमानी, शिवरायांचा जयजयकार करणारे बालचमू, सामाजिक व ऐतिहासिक देखावे अशा धार्मिक वातावरणात दौडचे स्वागत करण्यात आले. शिवभक्तांवर फुलांची उधळण करण्यात आली. शनिमंदिर येथे दौडची सांगता झाली. ताशिलदार गल्लीच्यावतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. जयाजी मोहिते यांनी बेळगावमध्ये काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडचे कौतुक करत यापुढेही असेच धर्मसंस्काराचे कार्य सुरू राहू दे, अशा शुभेच्छा दिल्या. स्वराज्यासाठी आपले मावळे एकनिष्ठ होते. तसेच आपणही एकनिष्ठ राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतील स्वराज्य घडवूया, असे आवाहन संतोष इंदुलकर यांनी केले. नगरसेविका वैशाली भातकांडे, अमूल्या बरमणी व अपूर्वा बरमणी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. संतोष इंदुलकर व जयाजी मोहिते यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. सोमवारी मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती.









