बैठक बंद दरवाजाआड, बैठकीवेळी स्पीकर – माईक ठेवले बंद, हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा इशारा, प्रोजेक्टरद्वारे थेट प्रसारण
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, याकरिता कार्यालयाच्या आवारात प्रोजेक्टर लावून बैठक पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी स्पीकर बंद ठेवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनने केला आहे. त्यामुळे
कॅन्टोन्मेंट विरोधात अवमानकारक याचिका दाखल करण्याचा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डला देण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक बंद दरवाजाआड घेण्यात येत होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हितावह कोणते निर्णय घेतले, याची माहिती सर्वसामान्यांना मिळत नव्हती. कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार बैठकीची माहिती सर्वसामान्यांना मिळणे आवश्यक आहे. पण नागरिकांना टाळण्यासह माध्यम प्रतिनिधींना देखील बैठकीत बसण्यास मज्जाव केला जात होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वसाधारण बैठकीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता सभागृहात नागरिकांना परवानगी देण्याची सूचना न्यायालयाने केली होती. पण सभागृहात आसन व्यवस्था पुरेशी नसल्याचे कारण कॅन्टोन्मेंट बोर्डने न्यायालयात दिले होते.
त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा किंवा टीव्ही, प्रोजेक्टर आदी प्रसारमाध्यमांचा उपयोग करून बैठकीत घडणाऱ्या घडामोडींची आणि निर्णयाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावला होता. त्यामुळे सर्वसाधारण बैठकीवेळी कॅमेऱ्याद्वारे प्रोजेक्टरवर बैठकीचे थेट प्रसारण करण्यात येत होते. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कॅन्टोन्मेंट कार्यालयाच्या आवारात आसन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
नागरिकांना टाळण्याचा प्रकार
मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के. यांनी सर्व नियम धाब्यावर बसविण्याचा प्रकार चालविला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी
कॅन्टोन्मेंट कार्यालयात फिरकू नये, अशी व्यवस्था केली आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आसन व्यवस्था हटविण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावला आहे. त्यापाठोपाठ मुख्य दरवाजा कायमस्वरुपी बंद ठेवून सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ चालविली आहे.
कॅन्टोन्मेंट कार्यालयात असंख्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवा बजाविली असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेवून सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. पण विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना टाळण्याचा प्रकार चालविला आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
कॅन्टोन्मेंट कार्यालयात घडणाऱ्या घटना व माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शाळेतील माहिती तसेच क्रीडास्पर्धा तसेच अन्य कार्यक्रमांची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असतात. याबाबतही
कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्याकडे वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधींनी तक्रार केली. त्यामुळे सर्व माहिती देण्याची सूचना कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना केली.
अवमानकारक याचिका दाखल करण्याचा इशारा
अलीकडे तर बैठकीतील वृत्तांत सर्वसामान्य नागरिकांना समजू नये, अशी व्यवस्थाच केली आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीवेळी केवळ प्रोजेक्टरद्वारा बैठकीची माहिती प्रसारित करण्यात आली. पण येथील माईक बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बैठकीत कोणती चर्चा झाली, याची माहिती कार्यालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या नागरिकांना समजू शकली नाही. तसेच या ठिकाणी असलेल्या खुर्च्यादेखील हटविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. बैठकीचा वृत्तांत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रोजेक्टरद्वारा माहिती दिली जाते. पण ही सुविधा बंद ठेवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बंगलो ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी रंजन शेट्टी यांनी याबाबत कार्यालयीन अधिक्षक एम. वाय. ताळुकर तसेच अभियंते सतीश मन्नुरकर यांच्याकडे तक्रार नोंदविली. प्रत्येक बैठकीला कोणत्या ना कोणत्या अडचणी सांगून बैठकीतील वृत्तांत दाखविण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. जर असेच सुरू राहिल्यास ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवून अवमानकारक याचिका दाखल करू, असा इशारा त्यांनी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना दिला. पुढील बैठकीत दुरुस्ती केली जाईल, असे सांगून कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.









